

गारगोटी : पाटगाव येथे क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मैदानावरच कोसळून 17 वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू संपूर्ण परिसराला सुन्न करून गेला. उत्कर्ष सुरेश देसाई असे या युवकाचे नाव असून त्याच्या अकाली जाण्याने पाटगावसह भुदरगड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सोमवारी सायंकाळी पाटगाव येथे हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेटचा सामना रंगात आला होता. मैदानावर जल्लोष आणि मित्रांच्या टाळ्यांचा गजर सुरू असतानाच सायंकाळी साडेसातच्या सुमारास उत्कर्ष अचानक खेळता खेळता कोलमडून खाली पडला. क्षणात आनंदाचे वातावरण भयाण शांततेत बदलले. सहकार्यांनी धावपळ करत त्याला तातडीने उपचारासाठी गारगोटी येथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. बिद्री येथील दूध साखर विद्यालयात तो बारावी विज्ञान शाखेत शिकत होता.