कोल्हापूर : शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने झालेल्या लढतीत पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघाने बालगोपाल तालीम मंडळावर एकमेव गोलने निसटता विजय संपादन केला. ‘केएसए’ शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेतील या सामन्यात तुलनेने बलवान असलेल्या पाटाकडील संघाविरुद्ध बालगोपालने दिलेली कडवी झुंज उपस्थित फुटबॉलप्रेमींच्या टाळ्या घेऊन गेली. त्याआधीच्या लढतीत सुभाषनगर फुटबॉल क्लबने संध्यामठ तरुण मंडळावर 2-1 अशी मात करून आपली घोडदौड कायम राखली. ‘केएसए’ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे.
पाटाकडीलचा गोल पेनल्टीवर शुक्रवारी दुसरा सामना पाटाकडील ‘अ’ विरुद्ध बालगोपाल तालीम यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासूनच दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा घेत वेगवान खेळ सुरू केला. आघाडीसाठी योजनाबद्ध चढायांचा अवलंब केला. पाटाकडीलकडून प्रथमेश हेरेकर, ओंकार मोरे, रोहित पवार, नबी खान, महंमद सवाद, यश देवणे यांनी केलेले जोरदार प्रयत्न अपयशी ठरले. उत्तरार्धात प्रथमेश हेरेकरचा जोरदार फटका बालगोपालचा गोलरक्षक माजीद अहमदने उत्कृष्टरीत्या रोखला, तर प्रतीक बदामेच्या पासवर ओंकार मोरेची सोपी संधी वाया गेली. 47 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत बालगोपालच्या गोलक्षेत्रात गोलरक्षक माजी अहमद याने ओंकार मोरे याला अवैधरीत्या रोखले. यामुळे मुख्य पंचांनी पेनल्टीचा निर्णय दिला. यावर आरबाज पेंढारीने बिनचूक गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. बालगोपालकडून अभिनव साळोखे, रुद्रेश धुमाळ, सुजित आर., प्रतीक पोवार, देवराज मंडलिक, सनवीर सिंग यांनी गोल फेडण्यासाठी केलेल्या चढाया पाटाकडीलच्या बचावफळीने फोल ठरविल्या. यामुळे सामना पाटाकडीलने एकमेव गोलने जिंकला.
सुभाषनगरचा 2-1 ने विजय
तत्पूर्वी दुपारच्या सत्रात सुभाषनगर संघाने संध्यामठ तरुण मंडळाचा 2-1 असा पराभव केला. पूर्वार्धात सामन्याच्या 13 व्या मिनिटाला आर्यन पंदारे याने पहिला, तर उत्तरार्धात 64 व्या मिनिटाला सुधीर कोटीकला याने गोलची नोंद केली. सुभाषनगरकडून यश चव्हाण, प्रकाश संकपाळ, प्रवीण सुतार यांनी उत्कृष्ट खेळ केला. संध्यामठकडून 51 व्या मिनिटाला कपील शिंदे याने एकमेव गोलची नोंद केली. त्यांच्या विक्रम शिंदे, मसुद मुल्ला, श्रवण शिंदे यांनी गोल फेडण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. यामुळे सामना सुभाषनगरने 2-1 असा जिंकत 3 गुणांची कमाई केली.
आजचे सामने
झुंजार क्लब वि. रंकाळा तालीम मंडळ
वेळ : दुपारी 1.30 वाजता
खंडोबा तालीम मंडळ वि. सम्राटनगर स्पोर्टस्,
वेळ : दुपारी 4 वाजता.