

जयसिंगपूर : कर्नाटक राज्य सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अलमट्टी धरणाच्या बाधीत लोकांना मोबदला देऊन त्यांना स्थलांतरीत करण्यात येत असून याला तीव्र विरोध करण्यासाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित गावातील ग्रामपंचायतींनी 1 मे च्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधातील ठराव करून सदरचे ठराव पंतप्रधान कार्यालयास पाठविण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढविल्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेती, औद्योगीक व साखर कारखानदारीला सर्वात मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून याबाबत दुर्लक्ष केले जात असून केंद्र सरकारकडे गांभीर्याने पाठपुरावा न केल्याने याचा फटका सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला बसणार असल्याचे शेट्टी म्हणाले.