

कौलव : श्रीक्षेत्र वाडीरत्नागिरी येथे जोतिबा दर्शनासाठी सासनकाठी घेऊन गेलेल्या परिते (ता. करवीर) येथील भाविकांना तेथील पुजार्यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी परिते ग्रामस्थांनी गावातून मूक निषेध मोर्चा काढला.
काही पुजार्यांनी आमच्या भाविकांना विनाकारण शिवीगाळ केली असता आम्ही वाद मिटवण्यासाठी गेलो होतो. मात्र, आम्हालाही कोंडून घालायचा प्रयत्न केला. भाविकांना शोधून पाठलाग करून मारहाण केली. लाथा-बुक्या त्याचबरोबर डोक्यात नारळ मारले, असे सरपंच मनोज पाटील यांनी सांगितले.
परितेतील भाविक मानाची सासनकाठी घेऊन जोतिबा डोंगरावर गेले होते. तेव्हा किरकोळ कारणातून पुजारी व काही भाविकांत वादावादी झाली होती. त्यातून पुजार्यांनी भाविकांना बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. पोलिस खाते व देवस्थान व्यवस्थापन समितीने अशा प्रकारांना पायबंद घालावा, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अजित पाटील यांनी पुजार्यांच्या या कृत्याने श्रद्धेला तडा गेला असून, त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे सांगितले. यावेळी शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने निषेध मोर्चात सामील झाले होते. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच परिसरातून संतापाची लाट उसळली.
मद्यपान केल्याचा आरोप खोटा
परिते येथे संपूर्ण शाकाहारी यात्रा साजरी केली जाते. तसेच, या कालावधीत गावातील मटण विक्री व हॉटेल्स बंद असतात. मात्र, पुजार्यांनी पावित्र्य जपणार्या भाविकांवर मद्यपान केल्याचे व अन्य आरोप केले आहेत, ते निखालस खोटे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.