

कोल्हापूर : मुलाने आणि सुनेने वृद्ध आई-वडिलांच्या बँक खात्यातून सुमारे पाच लाख रुपयांचा अपहार करून फसवणूक केली. मुलगा बजरंग शंकर बोडके आणि सून रूपाली बजरंग बोडके यांच्याविरोधात शिरोली एमआयडीसी पोलिसांत आईने तक्रार दाखल केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे बनुताई शंकर बोडके आणि शंकर बोडके हे दोघे राहतात, तर मुलगा बजरंग शंकर बोडके आणि सून रूपाली बजरंग बोडके हे जवळच आपल्या मुलासह राहतात. बनुबाई यांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाला होता. तिच्या विम्याचे पैसे सुमारे पाच लाख रुपये बनुबाई शंकर बोडके यांच्या नावावर बँक खात्यात जमा झाले होते. आई-वडिलांच्या बँक खात्यात इतकी मोठी रक्कम असल्याने मुलगा बजरंग शंकर बोडके आणि सून रूपाली बजरंग बोडके यांनी एटीएम, गुगल पे, चेक व आरटीजीएस करून व दोन नातवांच्या नावावर एफडी करतो असे सांगून 4 लाख 87 हजार रुपये पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकेतून परस्पर काढून घेतले आणि त्या रकमेचा अपहार केला. याबाबत आई बनुबाई शंकर बोडके यांनी मुलगा बजरंग बोडके आणि सून रूपाली बोडके यांच्याविरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही.