

Panori elderly woman murder case
राशिवडे : राधानगरी तालुक्यातील पनोरी गावात वृद्धेच्या खून प्रकरणाचा तपास उलगडला असून, गावातीलच दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. श्रीमती हरी रेवडेकर (वय 73) यांच्या खुनाच्या आरोपाखाली कपिल भगवान पातले (वय 34) व अभिजित मारुती पाटील (वय 34) या दोघांना राधानगरी पोलिसांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या मदतीने ताब्यात घेतले. आर्थिक अडचण व कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे कृत्य केल्याचे कबुली दिली आहे.
गणेशोत्सवासाठी कोल्हापूरहून पनोरी येथे आलेल्या श्रीमंती रेवडेकर या मुलगा व सुना कोल्हापूरला परतल्यानंतर घरात एकट्याच राहात होत्या. ६ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या घरात मागील दरवाज्याने शिरून आरोपींनी वृद्धेच्या अंगावरील दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार करताच वृद्धेच्या डोक्यात मारहाण करून खून केला. त्यानंतर दागिने लुटून मृतदेह साडीमध्ये गुंडाळून गावातील गोबरगॅस टाकीत टाकण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी श्वानपथक व सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला. आरोपी विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन-तीन तास गायब असल्याचे लक्षात आले. यावरून त्यांच्यावर संशय बळावला. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. या गंभीर घटनेची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी विशेष पथके नेमली होती. पो.नि. संतोष गोरे, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पो.नि. रविंद्र कळमकर, एपीआय सागर वाघ आदींनी तपास मोहीम राबवून आरोपींना जाळ्यात ओढले.