

कोल्हापूर : पर्यावरण खाते हे सृष्टीला वाचवण्यासाठी योगदान देणार आहे. प्रदूषणमुक्त नदी अंतर्गत पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मंत्री मुंडे म्हणल्या, गेल्या वेळेस मी आले होते, त्यावेळी येथे पूर आला होता. पर्यावरण खात्याच्या माध्यमातून येथे पूर कसा येणार नाही, यासंदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहे. साखरशाळांबाबत अद्याप आढावा घेतला नाही. मात्र ऊसतोड कामगारांसोबत त्यांची मुले जात नाहीत, गावातच राहतात. त्यांची तिथेच राहण्याची आणि खाण्या-पिण्याची व्यवस्था आहे. सरकारी शाळांचे शिक्षण सुधारण्यासाठी त्या खात्याकडून योगदान झाले तर चांगले होईल. शिक्षण पद्धतीमध्ये आणखी बदल करण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या.
मुंबई, पुणे मेट्रो सिटी आहेत आणि तेथे प्रदूषण वाढले आहे. याची अनेक कारणे आहेत, असे सांगून मंत्री मुंडे म्हणाल्या, या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. त्यामुळे प्रदूषण काही क्षणासाठी असेल. यामध्ये मी स्वतः लक्ष घालणार आहे. शिवाय अनेक कारखान्यांकडून प्रदूषण होत आहे, याकडेही लक्ष देणार आहे.
मंत्री मुंडे म्हणाल्या, बीड प्रकरणासंदर्भात एसआयटी लावण्यासाठी सर्वात आधी मी मागणी केली आहे. या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव— संताप व्यक्त केला आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे ते स्वतः जातीने लक्ष घालून न्याय देतील. ऊसतोड कामगारांची पोरं ऊस तोडायला जातात, हे विदारक चित्र बदलण्याची गरज आहे.