Panhala News: वाघबीळ चौकातील उरल्यासुरल्या अतिक्रमणांवरही अखेर हातोडा

महसूल, नॅशनल हायवे आणि मेघा इंजिनिअरिंगची संयुक्त धडक कारवाई; वाघबीळ चौकाने घेतला मोकळा श्वास
Panhala News: वाघबीळ चौकातील उरल्यासुरल्या अतिक्रमणांवरही अखेर हातोडा
Published on
Updated on
इंद्रजित शिंदे

पन्हाळा : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील महत्त्वाच्या वाघबीळ चौकातील अतिक्रमणे, धोकादायक फ्लेक्सबाजी आणि वाढता अपघाताचा धोका याबाबत ‘पुढारी’ने आवाज उठवल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. यापूर्वी राबविण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेनंतरही शिल्लक राहिलेल्या अतिक्रमणांवर महसूल विभाग, नॅशनल हायवे आणि मेघा इंजिनिअरिंगच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईमुळे वाघबीळ चौक परिसर अतिक्रमणमुक्त झाला असून, वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वाघबीळ थांब्यापासून पेट्रोल पंपापर्यंतच्या महामार्गावर अलीकडच्या काळात अपघातांचे प्रमाण वाढले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानदारांनी केलेली पक्की व कच्ची अतिक्रमणे, अवजड जाहिरात फलक आणि वाहनांच्या मुक्त वाहतुकीला होणारा अडथळा यामुळे हा परिसर अपघातप्रवण बनला होता. या गंभीर समस्येकडे ‘पुढारी’ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर प्रशासनाने व्यापक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून प्रमुख अडथळे हटविले होते.

मात्र, पहिल्या कारवाईनंतरही काही ठिकाणी उरलेसुरले अतिक्रमण आणि जाहिरात फलक कायम होते. त्यामुळे अपघाताचा धोका पूर्णपणे टळला नव्हता. ही बाब गांभीर्याने घेत पन्हाळा महसूल विभाग, नॅशनल हायवेचे अधिकारी आणि मेघा इंजिनिअरिंगच्या पथकाने आज संयुक्तपणे घटनास्थळी धडक देत कारवाई केली. या मोहिमेत महामार्गाच्या वाहतुकीला अडथळा ठरणारी उरलेली अतिक्रमणे, दुकानांचे वाढीव शेड आणि अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यात आले. त्यामुळे महामार्गाचा परिसर मोकळा झाला असून, वाहनांच्या वाहतुकीसाठी अधिक जागा उपलब्ध झाली आहे.

प्रशासनाच्या या कारवाईमुळे पन्हाळा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या तिन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनधारकांना वाघबीळ चौकातील वळण आणि रस्त्याचा स्पष्ट अंदाज येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी ‘पुढारी’च्या पाठपुराव्याचे तसेच प्रशासनाच्या तत्पर कारवाईचे स्वागत केले आहे.

दरम्यान, महामार्गावरील उरलीसुरली अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला असला, तरी भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी नॅशनल हायवे आणि पोलिस प्रशासनाने कायमस्वरूपी दक्षता घ्यावी, अशी मागणी पन्हाळा आणि वाघबीळ परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news