

कोल्हापूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 च्या ‘सुपर स्वच्छ लीग’ विशेष श्रेणीत पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदने यश मिळविले. पन्हाळा शहराचा नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्याधिकारी चेतनकुमार माळी व पाणीपुरवठा अभियंता प्रिया तारळेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी केंद्रीय गृहनिर्माणनगर विकासमंत्री मनोहर लाल, राज्यमंत्री तोखन साहू, महाराष्ट्राच्या नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रधान सचिव नगरविकास डॉ. के. एच. गोविंदराज, राज्य मिशन डायरेक्टर स्वच्छ महाराष्ट्र शहरी नवनाथ वाठ उपस्थित होते. कचरामुक्त आणि हागणदारीमुक्त शहर यांसारख्या विविध घटकांमध्ये पन्हाळा शहराने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सर्व लोकप्रतिनिधी, नागरिक, नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांचे प्रयत्न व सहकार्य यामुळे हे यश मिळाले आहे. सन 2021, 2022, 2023 या तीन वर्षांत स्वच्छतेमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणार्या निवडक शहरांसाठी ‘सुपर स्वच्छ लीग’ ही श्रेणी सुरू करण्यात आली होती. या ‘लीग’मध्ये स्थान टिकवण्यासाठी किमान 85 टक्के गुण मिळणे आवश्यक होते. पन्हाळा शहराने 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून आपले स्थान बळकट केले आहे.