Panhala News: लेकीची पाठवणी अन् बापाची एक्झिट; माजगावात सनईचे सूर आक्रोशात बदलले

लेकीला सासरी पाठवल्यानंतर अवघ्या काही तासांतच वडिलांनी जगाचा निरोप घेतल्याने आनंदाच्या वातावरणावर दुःखाची छाया पसरली
Panhala News
Panhala News: लेकीची पाठवणी अन् बापाची एक्झिट; माजगावात सनईचे सूर आक्रोशात बदललेPudhari
Published on
Updated on

इंद्रजित शिंदे

पन्हाळा : “लेक लाडकी या घरची, होणार आता सासरची...” या भावनिक क्षणांचा अनुभव घेत असतानाच पन्हाळा तालुक्यातील माजगाव (माळवाडी) येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. आपल्या लेकीला सासरी पाठवल्यानंतर अवघ्या काही तासांतच वडिलांनी जगाचा निरोप घेतल्याने आनंदाच्या वातावरणावर दुःखाची छाया पसरली आहे.

सखाराम शिवाजी विचारे (वय ६४) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. काही तासांपूर्वीच त्यांची कन्या डॉ. सुविधा हिचा विवाह इंजिनिअर निखिल पाटील यांच्याशी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लेकीला डॉक्टर करून तिचे लग्न थाटात लावण्याचे स्वप्न सखाराम विचारे यांनी जपले होते. विवाह सोहळ्यात त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रत्येक विधीत त्यांनी आनंदाने सहभाग घेतला; गाण्यांच्या तालावर ठेका धरत त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘बाप’ म्हणून आपली जबाबदारी पूर्ण झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

सायंकाळी भावनिक वातावरणात डॉ. सुविधा यांची पाठवणी करण्यात आली. मात्र, लेकीला सासरी रवाना केल्यानंतर रात्री सुमारे ८ वाजता सखाराम विचारे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. छातीत तीव्र वेदना सुरू झाल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्या घरात काही तासांपूर्वी सनईचे मंगल स्वर घुमत होते, तेथे आता आक्रोश आणि हुंदक्यांचा आवाज ऐकू येत आहे. सखाराम विचारे यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच सासरी पोहोचलेल्या डॉ. सुविधाचा आक्रोश उपस्थितांची मने पिळवटून टाकणारा होता. एका बापाने लेकीच्या सुखासाठी आयुष्य वेचले, मात्र तिचे सुखी संसाराचे दिवस पाहण्यापूर्वीच त्याने जगाचा कायमचा निरोप घेतल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news