

अनिल कुंभार
पोहाळे तर्फ आळते : पन्हाळा पूर्व भाग व करवीर उत्तर भागात शेतामध्ये वन्यप्राण्यांची घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हे वन्यप्राणी पिकांचे अतोनात नुकसान करीत आहेत. या नुकसानीमुळे केवळ शेतीवर चरितार्थ चालविणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. वन विभागाचे अधिकारी या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनो तुम्हीच सांगा आम्ही शेती कशी करायची, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
शेत शिवारामध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शेत मजूरदेखील शेतात जाण्यास घाबरत आहेत. अनेक शेतकऱ्यांची जनावरे ही शेतातील वस्तीवर आहेत. शेतीच्या मशागतीसाठी, पिकांना पाणी पाजण्यासाठी व जनावरांच्या देखभालीसाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागत आहे. पन्हाळा पूर्व भाग व करवीर उत्तर भागात गेल्या दोन-तीन वर्षांत गव्यानी उस पिकाचे अतोनात नुकसान केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून उसाच्या लावणी झाल्या आहेत. याबरोबरच खोडवा पीकही जोमात आले आहे. परंतु, यातील बहुतांश ऊस पिके गव्यांनी फस्त केली आहेत. तसेच तुडवून नुकसान केले आहे. तसेच शाळू पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
गव्यांचा कळप शाळूचे पीक फस्त करत असल्याने शेतकरी चालू हंगामात कणीस यायच्या आधीच हा शाळू कापून जनावरांना वैरण म्हणून वापर करत आहेत. तसेच वानरांच्या काळपाकडूनही पिकांचे नुकसान होत आहे. या परिसरात रानडुकरांकडूनही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यातच वर्षभरापासून शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याकडून शेतकऱ्यावर हल्ला केल्याच्या घटनाही घडत आहेत. पन्हाळा पूर्व भागातील कुशिरे, गिरोली, सादळे-मादळे, कासारवाडी या परिसरात गव्यांचे कळप स्थिरावलेले आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. या वन्यप्राण्यांचा वन विभागाने कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.