

सागर यादव
कोल्हापूर : शिवचरित्रात 12 व 13 जुलै 1660 रोजी पन्हाळगड ते विशाळगड मार्गावर घडलेल्या प्रेरणादायी इतिहासाला उजाळा देण्यासाठी प्रतिवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात पन्हाळगड ते पावनखिंड या साहसी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केले जाते. या मोहिमेमुळे निर्माण होणारे नाते वर्षभर जपले जाते. स्थानिकांना पर्यटन व्यवसायासोबतच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हे नाते वर्षानुवर्षे अधिकच द़ृढ झाले आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगांतून बोचरा वारा, मुसळधार पाऊस, काटे-कुटे, चिखल, दगड-धोंड्यांनी माखलेल्या खडतर मार्गांवरून ही साहसी पदभ्रमंती होते. पन्हाळगड, राजदिंडीमार्गे मसाई पठार - कुंभारवाडी -मांडलाईवाडी करपेवाडी आंबेवाडी माळवाडी -पाटेवाडी - सुकामाचा धनगरवाडा - पांढरेपाणीमार्गे पावनखिंड असा सुमारे 50 किलोमीटर अंतराचा मोहिमेचा मार्ग आहे. पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेचे आयोजन करणार्या शिवभक्त-इतिहासप्रेमी संघटनांच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रमही आयोजित केले जातात. यात शालेय साहित्य वाटप, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण आदी उपक्रमांचा समावेश असतो. याशिवाय स्थानिकांना शहरात शिक्षण, आरोग्य, रोजगार यासह विविध कारणांसाठी यथाशक्ती मदत व सहकार्यही केले जाते.
मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. इतिहास अभ्यासासोबतच पर्यावरण, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यदायी अशा उपक्रमांची जोड मिळाली आहे. पर्यटनही विकसित झाले आहे. मोहीमवीर वर्षभर पन्हाळा ते विशाळगड मार्गावरील दुर्गम वाड्या-वस्त्यांत विविध उपक्रम राबवितात. सर्वच हंगामांत ऐतिहासिक, नैसर्गिक, साहसी पर्यटनासाठीही पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. झुणका भाकरी, खर्डा, चुलीवरचं मटण-चिकन, पोळ्या, खडुगळी, खुळा रस्सा, कोरड्यास अशा स्थानिक खाद्य पदार्थांना ट्रेकर्स, पर्यटकांकडून मागणी असते.