कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर आणि धरणक्षेत्रात धुवाँधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत आंबा, गगनबावडा, साळवण, आजरा, गवसे या गावांसह 15 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी 31 फुटांवर स्थिरावलेल्या पंचगंगेची पाणी पातळी गुरुवारी 32.2 फुटांपर्यंत वाढली. 52 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गुरुवारी राधानगरी धरण 70 टक्के भरले. धरणातून 3100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
शहरात सकाळ पर्यंत पावसाच्या हलक्या सरींची उघडझाप सुरू होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास तासभर शहरात धुवाँधार पाऊस झाला. सायंकाळपर्यंत हलक्या ते मध्यम सरी कोसळत होत्या. शहरातील प्रमुख चौकात पाणीच पाणी झाले होते. शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून सर्वत्र खड्डे झाले आहेत.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात 8 इंचांची वाढ झाली. गुरुवारी सकाळी सात वाजता 31 फूट 3 इंचावर असणारी पाणी पातळीत रात्री 8 वाजता 32 फूट 2 इंचांवर पोहोचली होती. जिल्ह्यातील 15 प्रकल्पांतून विसर्ग सुरू असून जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, सर्फनाला, कोदो, आंबेओहोळ हे 6 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
आंबा, गगनबावडा, साळवण, आजरा, गवसेत अतिवृष्टी
पंचगंगा 32.2 फुटांवर,
52 बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरण 70 टक्के भरले; वारणेतून विसर्ग वाढविला
जिल्ह्यात गेल्या 8 घरांची व भिंतींची पडझड झाल्याने 4 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आजरा तालुक्यातील हातगोळी ते पोवाडे येथील बंधारा खचल्याने यामार्गावरील एसटी सेवा बंद झाली आहे. 2 राज्य मार्ग, 6 जिल्हा मार्गांसह ग्रामीण भागातील 11 मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. तर, एसटीच्या एका मार्गावरील सेवेवरही परिणाम झाला आहे.