

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाने बुधवारी काहीशी विश्रांती घेतली. मध्यरात्रीच्या कोसळधारांनंतर शहरात दिवसभर पावसाने उसंत घेतली होती. मात्र, धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासांत दहा धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. पावसाच्या उघडीपीमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात दोन इंचांची घट झाली असून, रात्री 9 वाजता पातळी 25 फूट 3 इंचांवर होती. 17 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला गुरुवारी (दि. 19) यलो अलर्ट दिला आहे.
शहरात मध्यरात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यानंतर सकाळपासून पावसाने उघडीप घेतली होती. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यातही काही प्रमाणात असेच चित्र होते. गेल्या 24 तासांत शहरात तुरळक 9 मि. मी. तर 12 तालुक्यांत सरासरी 14.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासांत राधानगरी, वारणा, दूधगंगा, कडवी, पाटगाव, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, सर्फनाला, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 8 तासांत धरण क्षेत्रातील पावसाचा जोर काहीसा ओसरला होता.
अद्याप 17 बंधारे पाण्याखाली आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ. कुंभी नदी : सांगशी. कासारी नदी : ठाणे आळवे, बरकी, यवलूज. भोगावती नदी : हळदी, राशिवडे, शिरगाव. दूधगंगा नदी : दत्तवाड, सुळकूड, सिद्धनेर्लीचा समावेश आहे.