कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर मंगळवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथगतीने वाढ होत आहे. सोमवारी रात्री ३४ फूट ६ इंचांवर असलेली पंचगंगा मंगळवारी रात्री १२ वाजता ३६.२ फुटांपर्यंत पोहोचली. दिवसभरात दीड फुटाची वाढ झाली असून नदी अद्याप इशारा पातळीपासून तीन फूट दूर आहे. गेल्या २४ तासांत राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यांसह जिल्ह्यातील २४ ठिकाणी अतिवृष्टी झाली. १७ धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस झाला. मात्र, गेल्या आठ तासांपासून पावसाचा जोर कमी झाला. हवामान विभागाने बुधवारी (दि. ८) जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे. जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. चंदगड तालुक्यातील पिळणी, कानूर बुद्रुक, भोगोली, कानूर खुर्द आणि बिज्जूर या गावांचा संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर कमी; धरण, नद्यांच्या पातळीमध्ये मात्र वाढ सुरूच
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर मंगळवारी काहीसा कमी झाला. धरण क्षेत्रात मात्र पावसाची हजेरी कायम होती. त्यामुळे धरणांसह नद्यांच्या पाणी पातळीत मात्र वाढ सुरूच आहे. जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच धरणांचा पाणीसाठा वाढत आहे.
ग्रामीण भागातील ६२ घरांची अंशतः पडझड झाली आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांत सरासरी ४७.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या आठ तासांत दूधगंगा, चित्री आणि सर्फनाला धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली.
शहरात पुराचे पाणी करवीर पंचायत समितीच्या मागील बाजूस हळूहळू सरकत आहे. रुईकर कॉलनी चौकात एक झाड उन्मळून पडलेे. मंगळवारी सकाळी ७ वा. पंचगंगेची पाणी पातळी ३५ फूट ३ इंच होती. ती सायंकाळी ६ वाजता ३५ फूट ११ इंचांवर, तर रात्री १२ वाजता ३६.२ फुटांपर्यंत पोहोचली. पावसाचा जोर कमी झाल्याने नदीच्या पाणी पातळीत सध्या संथ वाढ होत असून पुराचे पाणी गायकवाड यांच्या पुतळ्याच्या पुढे रस्त्याच्या एका बाजूला आले आहे.
खासगी मालमत्तांचे २२ लाखांचे नुकसान
जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये पावसामुळे घरांची पडझड सुरू आहे. गेल्या २४ तासांमध्ये ६२ घरांची अंशतः पडझड झाली. तर ३ जनावरांच्या गोठ्यांचीही पडझड झाली. ६३ खासगी मालमत्तांचे २२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. तर तीन सार्वजनिक मालमत्तांचे २ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले.
अनेक मार्ग पाण्याखाली
इतर जिल्हा मार्ग ८, ग्रामीण मार्ग १४ असे एकूण २२ मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. राज्यमार्ग ४ तर सात प्रमुख जिल्हा मार्ग बंद असून वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.
२४ गावांत अतिवृष्टी
राधानगरी तालुक्यात राधानगरी, सरवडे, आवळी, कसबा वाळवे येथे अतिवृष्टी झाली. पन्हाळा तालुक्यात पन्हाळा, पडळ, बाजारभोगाव, कोतोली; शाहूवाडी तालुक्यात करंजफेण, गगनबावडा तालुक्यात गगनबावडा, साळवण; करवीर तालुक्यात सांगरुळ, बालिंगा; गडहिंग्लज तालुक्यात नेसरी, भुदरगड तालुक्यात कूर, करडवाडी; आजरा तालुक्यात आजरा, गवसे, मलिग्रे तर चंदगड तालुक्यात चंदगड, नारंगवाडी, मानगाव, कोवाड, तुर्केवाडी, हेरे या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.
परखंदळेत झाड पडले
कोल्हापूर ते गगनबावडा रोडवरील परखंदळे येथील आतकीरवाडी-मेंगाणेवाडी फाटा (ता. पन्हाळा) येथे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मोठे झाड उन्मळून पडले. कळे ते गगनबावडा रोडवर अनेक ठिकाणी वाळलेली अनेक धोकादायक झाडे आहेत.
राशिवडेत घराची भिंत कोसळली
राशिवडे : येथील राजाराम तुकाराम चांदणे यांच्या राहत्या घराची भिंत कौलासह ढासळल्याने सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले.
गडहिंग्लजला पावसाची उसंत
गडहिंग्लज : गडहिंग्लजला मंगळवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली. निलजी व ऐनापूर हे दोन्ही बंधारे पाण्याखाली असून या कालावधीत हरळी ते इंचनाळ पुलावरून होणारी वाहतूकही इंचनाळ पुलावर पाणी आल्याने बंद करण्यात आली.
धामणी मध्यम प्रकल्प निर्देशित पाणी पातळीपर्यंत भरला
म्हासुर्ली : राई (ता. राधानगरी) येथील धामणी मध्यम प्रकल्प २०२६ च्या निर्देशित पाणी पातळीपर्यंत भरला असून प्रकल्पाच्या सेवाद्वारातून २५० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पाटबंधारे विभागाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जांबरे धरण ८3 टक्के भरले
चंदगड : चंदगड तालुक्यात पावसाचा जोर कायम असून जांबरे धरण पाणलोट क्षेत्रात अती पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने मंगळवारी सकाळी ७ वाजता ८३ टक्के क्षमतेने भरले आहे.
पाटगाव धरणात ४३.२४ टक्के साठा
गारगोटी : भुदरगड तालुक्यात दमदार पावसामुळे कोंडोशी लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरला असून पाटगाव, फये आणि चिकोत्रा धरणांतील पाणीसाठाही झपाट्याने वाढत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची टेकवाडीला भेट
साळवण : गगनबावडा तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. तिसंगी पैकी टेकवाडी येथे भेट देऊन त्यांनी महापुरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पंचायत समिती सभापती छाया देसाई, सदस्य अमर कांबळे, तहसीलदार रूपाली सूर्यवंशी, मंडल अधिकारी विनय बोळके, तलाठी रियाज रेठरेकर, प्रतीक खाडे, सहायक पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, ग्रामसेवक एकनाथ चौगुले, सरपंच सर्जेराव पाटील, माजी सभापती बंकट थोडगे उपस्थित होते.