Kolhapur Flood Alert| पंचगंगा धोका पातळीकडे
कोल्हापूर : जिल्ह्यात तीन दिवस सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी पहाटे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली. सध्या पंचगंगेची पातळी 41 फूट 11 इंचांवर असून, ती 43 फूट या धोका पातळीकडे वेगाने जात आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर केर्ले ते केर्लीदरम्यान कासारी नदीचे पाणी आल्याने दुपारनंतर हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. बावडा-शिये रोड रात्री बंद करण्यात आला. पंचगंगेच्या पुराचे पाणी जामदार क्लबच्या पुढे आले आहे. धरण क्षेत्रात धुवाँधार पाऊस सुरू असल्याने नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. ‘राधानगरी’सह 16 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. नद्यांची पाणी पातळी तासागणीक वाढत असल्याने पूर क्षेत्रातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे.
शहरात दिवसभर पावसाने उघडीप घेतली होती. दुपारपर्यंत काहीकाळ सूर्यदर्शनही झाले. मात्र, पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. अधूनमधून मध्यम सरी कोसळत होत्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचा जोर होता. राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, शाहूवाडी, चंदगड या तालुक्यांत पावसाचा जोर होता. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर केर्ले ते केर्लीदरम्यान बुधवारी सकाळी पाणी आले. सकाळी येथून एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र, दुपारनंतर पाणी पातळी वाढल्याने हा महामार्ग बंद करण्यात आला. जोतिबा फाटा येथे बॅरिकेड लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. केर्ली गावातून जाणारी वाहतूक जोतिबामार्गे वळवण्यात आली आहे.
पुराच्या पाण्याने वाढवली धाकधूक
पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी आंबेवाडी ते प्रयाग चिखलीदरम्यानच्या रस्त्यावर काही ठिकाणी पाणी आले आहे. तर, काही घरांच्या मागील बाजूच्या भिंतींना पाणी लागले आहे. यामुळे आंबेवाडी, चिखलीतील ग्रामस्थांची धाकधूक वाढली आहे. प्रयाग चिखली पुलावरून वरणगे पाडळीकडे जाणार्या मार्गावर गुडघाभर पाणी आहे. या पाण्यातून धोकादायकरीत्या वाहतूक सुरू होती.
पोवार पाणंद रस्ता बंद
शिवाजी पुलाकडून वडणगेकडे जाणार्या पोवार पाणंद रस्त्यावर पाणी आले. रात्री हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला.
केर्ली फाटा आणि वडणगे फाटादरम्यानच्या परिसरातदेखील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक शिवाजी पूल-वडणगे फाटा-वडणगे- निगवे दुमाला-जोतिबा रोड-वाघबीळ-रत्नागिरी या मार्गाने वळवण्यात आली आहे.
पंचगंगेच्या पाणी पातळीत दोन फुटांची वाढ
पंचगंगेने बुधवारी पहाटे पाच वाजता 39 फूट ही इशारा पातळी गाठली. यानंतर सकाळी सात वाजेपर्यंत पातळी 39 फूट 5 इंचांवर होती. दिवसभरात 2 फूट 6 इंचांनी वाढून रात्री 11 वाजता पातळी 41 फूट 11 इंचांवर होती.
राधानगरी, कसबा तारळे, आंबा, साळवणमध्ये अतिवृष्टी
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 109.3 मि.मी. पाऊस झाला. याशिवाय हातकणंगले 13.1 मि.मी., शिरोळ 9.5, पन्हाळा 29.1, शाहूवाडी 50, राधानगरी 63.9, करवीर 18.2, कागल 33.6, गडहिंग्लज 28, भुदरगड 43.4, आजरा 42.2, चंदगड 39.5 मि.मी. पाऊस झाला. तसेच, राधानगरी, कसबा तारळे, आंबा, साळवण या गावांत अतिवृष्टी झाली.
जिल्ह्यातील 74 मार्ग बंद
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग सुरू आहेत. 10 राज्यमार्ग बंद झाले. 29 प्रमुख जिल्हा मार्ग, 11 इतर जिल्हा मार्ग आणि 24 ग्रामीण मार्ग असे एकूण 74 रस्ते व बंधार्यांवर पाणी आल्याने बंद झाले आहेत. त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.

