

आशिष शिंदे
कोल्हापूर : प्रदूषणाच्या नानाविध कारणांमुळे विषाक्त झालेल्या पंचगंगेसह जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या चार महिन्यांत तब्बल 61 जणांना कावीळ झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जिल्ह्यात 45 जणांना ॲक्युट हिपॅटायटीस, तर 16 जणांना तीव काविळीची लागण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आशा वर्कर्सच्या मदतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे आणि ओ.टी. टेस्टद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नद्यांमध्ये मिसळणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यामुळे नद्यांचे पाणी विषारी बनले असून, त्यातूनच कावीळ आणि हिपॅटायटीससारख्या साथरोगांचा वेगाने प्रसार होत आहे.
यामुळे होते कावीळ
नदीपात्रामधील पाण्यात सांडपाणी, मलमूत्र विसर्जन आणि जलवाहिन्यांच्या गळतीमुळे हिपॅटायटीस ए आणि ई यासारखे विषाणू मिसळत आहेत. हे विषाणू यकृतावर हल्ला करतात, ज्यामुळे यकृताला सूज येऊन रक्तातील पिवळे द्रव्य (बिलिरुबिन) वाढते आणि रुग्णाला कावीळ होते.
काविळीची लक्षणे
तीव थकवा जाणवणे, भूक मंदावणे, मळमळ होणे, उलट्या, रक्तातील ‘बिलिरुबिन’चे वाढलेले प्रमाण, त्वचा आणि नखे पिवळी पडणे, लघवीचा रंग गडद पिवळा, ताप येणे, पोटात उजव्या बाजूला दुखणे किंवा अंगाला खाज सुटणे.
‘या’ ठिकाणी काविळीचे रुग्ण सर्वाधिक
तालुका कावीळ रुग्णसंख्या
कोल्हापूर शहर 30
राधानगरी 12
शिरोळ 09
करवीर 05
हातकणंगले 02
भुदरगड 01
पन्हाळा 01