

कुरुंदवाड/ शिरोळ : पंचगंगा नदी प्रदूषणामुळे मानवी आरोग्याबरोबरच जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडत आहे. याकडे प्रदूषण मंडळाबरोबरच प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा जाब विचारत प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रशासनाने तत्काळ पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करून जनतेला शुद्ध पाणी द्यावे अन्यथा उग््रा स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग््रेास पक्षाचे शिरोळ तालुका अध्यक्ष दरगू गावडे आणि पंचगंगा नदी बचाव कृती समितीचे प्रमुख शेखर पाटील यांनी दिला आहे.
शिरोळ तालुक्याची जीवनदायिनी मानली जाणारी पंचगंगा नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, नदीत लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव आक्रमक भूमिका घेतली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येबाबत वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळाने व जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम म्हणून शिरोळ येथील बंधाऱ्याजवळ नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळले. या घटनेमुळे पर्यावरणासोबतच नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी शिरोळ बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली. यावेळी काँग््रेासचे शिरोळ तालुका अध्यक्ष दरगू गावडे,पंचगंगा नदी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष बंडू पाटील, सदस्य विश्वास बालिघाटे, शेखर पाटील नगरसेवक सचिन शिंदे, माजी सरपंच गजानन संकपाळ, कृष्णराव भाट, बापूसाहेब गंगधर, वसंत चुडूमुंगे आदींनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
बंडू पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हलगर्जीपणामुळेच शिरोळ तालुक्यातील नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हा प्रशासनावर केला. पुढील दोन दिवसांत प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांचे वीज कनेक्शन तत्काळ खंडित करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर हजारो नागरिकांसह धडक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बंडू पाटील यांनी दिला आहे.