Panchganga River | पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर

पातळी २९.९ फुटांवर; १२ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; राधानगरी ८४ टक्के भरले
पंचगंगेचे पाणी बुधवारी रात्री दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले.
पंचगंगेचे पाणी बुधवारी रात्री दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले. (छाया : नाज ट्रेनर)
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत शहरात धुवाँधार पाऊस सुरू होता. यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी बुधवारी रात्री दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली. रात्री १२ वाजता पाणी पातळी २९ फूट ९ इंचांवर पोहोचली होती. २४ तासांत गगनबावडा तालुक्यासह १२ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण ८४ टक्के भरले असून धरणाच्या पॉवर हाऊसमधून रात्री १० नंतर १,४०० क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्याला शुक्रवार (दि. २४) पर्यंत पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

बुधवारी शहरात सायंकाळनंतर धुवाँधार सरी बरसत होत्या. परिणामी, सखल भाग जलमय झाले होते. यामुळे ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली. जिल्ह्यात २४ तासांत १९.१ मि.मी. पाऊस झाला. यामध्ये गगनबावड्यात अतिवृष्टी झाली तर राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, चंदगड तालुक्यांत जोरदार पाऊस झाला.

नृसिंहवाडीतील दत्त मंदिरासमोर कृष्णा नदीचे दुसऱ्यांदा पाणी

नृसिंहवाडी : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरासमोर यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा कृष्णेचे पाणी आले आहे. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात व कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. पुराचे पाणी वाढून दत्त मंदिरासमोर पोहोचले असून बुधवारी दिवसभरात पातळीत दीड फुटाने वाढ झाली आहे. पुराचे पाणी मंदिर परिसरात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने भाविकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाण्याच्या पातळीत आणखी वाढ झाल्यास चालू वर्षातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news