

कोल्हापूर : जिल्ह्यात सर्वदूर पावासाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन दिवसांपूर्वी पात्रात गेलेल्या पंचगंगेचे पाणी मंगळवारी पुन्हा पात्राबाहेर पडले. दिवसभरात पंचगंगेच्या पाणी पातळीत 8 इंच वाढ होऊन रात्री आठ वाजता पातळी 30 फूट 8 इंचावर गेली. गेल्या 24 तासांत राधानगरी, गगनबावडा या गावांसह आठ धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. हवामान विभागाने जिल्ह्याला आजपासून शुक्रवार (दि. 4) पर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे.
शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी शहरात पावसाची उघडझाप सुरू होती. अधूनमधून कोसळलेल्या मध्यम सरींसह दिवसभर पावसाची हलकी रिपरिप सुरू होती. जिल्ह्याच्या काही भागात दमदार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. गेल्या 24 तासांत शहरात 16 मि. मी. तर जिल्ह्यात सरासरी 24.8 मि. मी. पाऊस झाला. धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी, तुळशी, दूधगंगा, पाटगाव, चिकोत्रा, सर्फनाला, धामणी, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 8 तासांत पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. रात्री उत्तरेश्वर पेठेकडून शिंगणापूरकडे जाणार्या रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला.
दोन दिवसांपूर्वी पात्रात गेलेली पंचगंगा नदी जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा पात्राबाहेर आली. पाणी पंचगंगा विहारकडे जाणार्या मार्गावर आले आहे. सकाळपासून पाणी पातळीत संथ गतीने वाढ सुरू आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजता पाणी पातळी 29 फूट 10 इंचांवर होती. दिवसभरात यामध्ये 8 इंचांची वाढ होऊन रात्री आठ वाजता पातळी 30 फूट 8 इंचावर पोहोचली होती. अद्याप 34 बंधारे पाण्याखाली असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.