

कोल्हापूर : जिल्ह्यात सर्वदूर धुवाँधार पाऊस सुरू आहे. राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांसह जिल्ह्यातील २२ गावांमध्ये अतिवृष्टी झाली. अवघ्या २४ तासांत नदीची पाणीपातळी तब्बल ९ फुटांनी वाढून शनिवारी रात्री १२ वाजता ती २६ फूट २ इंचांवर पोहोचली. वाढत्या पाण्याने नदीवरील मारुती मंदिराच्या पायरीलाही स्पर्श केला.
गत २४ तासांत जिल्ह्यातील १२ तालुक्यांत एकूण ५९५ मि.मी., तर १६ धरण क्षेत्रांत २,१७० मि.मी. पाऊस पडला. दरम्यान, रविवारी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांमध्ये शहरात ४८.३ मि.मी. पावसाची नोंद झाली.
राधानगरी, सरवडे, कसबा वाळवे, आवळी, गगनबावडा, साळवण, सांगरुळ, बालिंगे, कोडोली, पडळ, कोतोली, भेडसगाव, बांबवडे, सरुड, मलकापूर, आंबा, नेसरी, आजरा, मलिग्रे, वठार, बिद्री या ठिकाणी अतिवृष्टी झाली.
पावसामुळे पन्हाळा तालुक्यात कोडोली आणि बोरपाडळे येथे तीन घरांच्या भिंती पडल्या; तर आजरा तालुक्यात मौजे मेंढोली आणि आजरा येथे घराची भिंत पडली. गवसे येथे घरावर झाड पडल्याने नुकसान झाले.
पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ. कासारी नदी : यवलूज, बा. भोगाव, पुनाळ-तिरपण, वालोली. वारणा नदी : कोडोली, मांगले-सावर्डे. कडवी नदी : कोपार्डे, सवते-सावर्डे, सरुड-पाटणे. भोगावती नदी : हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे. कुंभी नदी : शेणवडे.