.jpeg?rect=0%2C0%2C1029%2C579&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpeg?rect=0%2C0%2C1029%2C579&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा.
पंचगंगा नदीने इशारा आणि धोका या दोन्ही पातळ्या ओलांडल्याने शिरोळ तालुका भयभीत झाला आहे. कुरुंदवाड एसटी डेपो आगाराचे टाकळीवाडी गुरुदत्त साखर कारखाना आणि शिरोळ दत्त सहकारी साखर कारखान्यात स्थलांतर करण्यात आले आहे.
गोठणपूर परिसरातील नागरिकांनी आपल्या जनावरासह तेरवाड माळावरती स्वतःहूनच स्थलांतर व्हायला सुरुवात केली आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कुरुंदवाड,बस्तवाड, अकिवाट, राजापूर, खिद्रापूर येथील पूर परिस्थितीची पाहणी केली.
दरम्यान राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने संध्याकाळपर्यंत आणखीन पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने कुरुंदवाड पालिका प्रशासन आणि महसूल प्रशासनाने आपली स्थलांतर पथक सज्ज ठेवले आहे.
कुरुंदवाड गोठणपूर शिकलगार वसाहत आणि भैरवडी पूल परिसरातील पंचगंगा नदीच्या काठावर असणाऱ्या नागरिकांनी आणि जनावरांचे गोठे असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली जनावरे स्थलांतरित केली आहेत. आज पहाटेपासून स्थलांतराचे काम सुरू झाले आहे.
या परिसरातील नागरिकांनी फ्रिज टीव्ही सह इलेक्ट्रॉनिक वस्तू प्लायवूडचे लाकडी साहित्य मित्र मंडळींच्या पहिल्या दुसऱ्या मजल्यावर स्थलांतर केले आहेत. कुरुंदवाड एसटी डेपो आगारचे मेकॅनिकल साहित्य व व्यवस्थापनाचे साहित्य गुरुदत्त साखर कारखाना टाकळीवाडी येथे तर काही वाहने दत्त कारखाना येथे स्थलांतर केले आहे.
अशी माहिती आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे यांनी दिली.पशुधनाचे स्थलांतर करत असताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनावरांची तपासणी करून योग्य तो सल्ला देत स्थलांतरासाठी मदत करत आहेत.
कुरुंदवाड परिसरात आमदाबाद पाटील यड्रावकरांनी भेट दिली असता ते म्हणाले महापूर येऊ नये यासाठी प्रशासन कार्यरत आहे. पाणलोट क्षेत्रातील आणि धरण क्षेत्रातील पावसाची परिस्थिती पाहता पाणी पातळी वाढत आहे. तरीदेखील नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपले संरक्षण करावे अलमट्टी धरणातून आणखीन पाण्याचा विसर्ग वाढवण्यासाठी राज्य सरकार कर्नाटक सरकारची चर्चा करत आहे असे सांगितले.