

कोल्हापूर : पंचगंगेच्या पुराचे पाणी आंबेवाडीत शिरले. चिखली गावाला गुरुवारी बेटाचे स्वरूप आले. यासह वरणगे, पाडळी या गावांभोवतीही पुराचा विळखा घट्ट होत चालला आहे. वाढत्या पाण्यामुळे आंबेवाडी, चिखलीतील ग्रामस्थांनी बुधवारी रात्रीपासून स्थलांतर सुरू केले.
गुरुवारी सकाळपासून आंबेवाडी-चिखली मार्गावरील पाण्याची पातळी वाढत गेल्याने ग्रामस्थांनी स्थलांतर सुरू केले. आंबेवाडी व चिखली गावांमध्ये गुरुवारी अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. काही घरांच्या उंबरठ्यापर्यंत पाणी पोहोचले होते.
आठ गरोदर माता, दिव्यांग व वृद्ध नागरिकांना प्रथम सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. गुरुवारपर्यंत सुमारे 70 ते 75 टक्के ग्रामस्थांचे स्थलांतर पूर्ण झाल्याचे सरपंच रोहित पाटील यांनी सांगितले. सोनतळी येथे स्थलांतरितांसाठी सोय करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर-ट्रॉली व टेम्पोच्या साहाय्याने जनावरे, गाड्या आणि घरगुती सामान सुरक्षित स्थळी नेले जात होते. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. मात्र, बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला. यामुळे धरणातील पाण्याची आवकही कमी झाली. परिणामी, धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला. पंचगंगेची पातळी कोल्हापूरसह पुढे हातकणंगले, शिरोळ तालुक्यात वाढत गेली.
राधानगरी : 4356, तुळशी धरण : 750, वारणा : 15369, दूधगंगा : 18600, कासारी : 1500, कडवी : 932, कुंभी : 1085, पाटगाव : 1306, चिकोत्रा : 300, चित्री: 825,जंगमहट्टी : 634, घटप्रभा : 4277, जांबरे : 1259, आंबेओहोळ : 259.
अलमट्टी धरणातून 2 लाख 50 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणात 1 लाख 71 हजार 756 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 16.6 मि.मी. पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक 50.8 मि.मी. पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. याशिवाय हातकणंगले 8.5 मि.मी., शिरोळ 5.1, पन्हाळा 25.8, शाहूवाडी 19.1, राधानगरी 38.8, करवीर 10.1, कागल 10.1, गडहिंग्लज 12.7, भुदरगड 16.7, आजरा 25.9, चंदगडमध्ये 16.6 मि.मी. पाऊस पडला.
अतिवृष्टीमुळे तात्पुरत्या स्वरूपात एकूण 62 कुटुंबे निराधार झाली. आतापर्यंत निराधार कुटुंबांची संख्या 102 वर पोहोचली आहे, तर पूरबाधित व्यक्तींची संख्या 432 वर गेली आहे.
जिल्हा आपत्ती विभागाच्या माहितीनुसार शाहूवाडी तालुक्यातील विरळे, जांबूर, पळसवडे, कांडवण, शिरोळ, सावर्डी, चरण, आंबेकरवाडी, सोंडोली, बर्की, तर चंदगड तालुक्यातील पिळणी, रेठरे या गावांचा संपर्क तुटला आहे.