

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या दुसर्या दिवशी मंगळवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महाविद्या बगलामाता रूपात जडावी सालंकृत पूजा बांधण्यात आली. दुपारी विधिवत स्नान झाल्यानंतर अंबाबाई बगलामाता रूपात सजवण्यात आली. पुजारी अजित ठाणेकर, श्रीनिवास जोशी व नितीन सांगवडेकर यांनी ही पूजा बांधली. सकाळी साडेसहा, साडेआठ व साडेअकरा वाजता अंबाबाईला भाविकांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.
यंदा दशमहाविद्या रूपात अंबाबाईच्या पूजा बांधण्यात येत आहेत. त्यापैकी मंगळवारी श्री बगला मातेच्या रूपातील अंबाबाईचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभरात कारंजा चौकातील मंडपात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अमृत समुद्रातील, मणिमंडपाच्या रत्नखचित वेदावरील सिंहासनारूढ पीतवर्णाची, एकहाती शत्रूची जीभ व एक हाती गदा धारण केलेली असे या श्री बगलामातेचे रूप आहे.
भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात धार्मिक प्रथेनुसार नवरात्रौत्सव साजरा केला जात आहे. मंगळवारी तुळजाभवानीची गजारूढ रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली व अभिषेक, पूजाविधी करण्यात आले. दिवसभर मंडपात भक्तिगीतांचे कार्यक्रम सादर करण्यात आले.
नवरात्रौत्सवात दररोज अंबाबाईचा पालखी सोहळा साजरा केला जातो. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता फुलांनी सजवलेल्या सुवर्णपालखीतून उत्सवमूर्ती प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. पारंपरिक लवाजमा, भालदार चोपदार यांच्या साथीने पालखी सोहळा संपन्न झाला.