Pahalgam Terror Attack : हॉर्स रायडिंगने वाचला जीव!

गारगोटीच्या सुदेश सापळे यांनी सांगितले भयान वास्तव; 20 जण पहलगाममध्ये सुखरूप
Pahalgam terror attack
गारगोटीच्या सुदेश सापळे यांनी सांगितले भयान वास्त
Published on
Updated on

कोल्हापूर : मंगळवारी दुपारी बेताब व्हॅलीचे निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवत, तेथे घोडेस्वारी करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अर्धा तास घोड्यावरून रपेट करून पुढे जाण्यास सुरुवात केली, काही अंतरावर पोहोचलो, तोच लोक घाबरून पळत येताना दिसले. काही क्षणात गोळीबार झाल्याची आणि त्यानंतर काही मिनिटांत दहशतवादी हल्ला झाल्याचे समजले आणि सार्‍यांच्याच काळजात धस्स झाले.

केवळ अर्धा तास हॉर्स रायडिंग केले आणि त्यामुळेच सर्वांचा जीव वाचला, अशा भावना गारगोटी येथील सुदेश सापळे यांनी व्यक्त केल्या. मंगळवारपासूनच पहलगाममध्ये असलो, तरी सर्व 20 जण सुरक्षित असल्याचे सांगत, त्यांनी पर्यटनाच्या नंदनवनातील वास्तव सांगितले.

खासगी टूर ऑपरेटर कंपनीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील बारा लोकांसह 20 जणांचा ग्रुप जम्मू काश्मीरला आला आहे. मंगळवारी दुपारी पहलगाममधून बेताब व्हॅलीत गेलो. तेथून बैसरन व्हॅलीत जाण्यासाठी निघालो, त्याच या परिसरात हॉर्स रायडिंग करायचा निर्णय घेतला. अर्धा तास हॉर्स रायडिंग केले आणि बैसरन व्हॅलीच्या दिशेने सर्वजण दंगा मस्ती करत, आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत निघालो. बैसरन व्हॅलीपासून अवघ्या पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावर असतानाच, या व्हॅलीकडून लोक पळत येताना दिसले. एकाने व्हॅलीत गोळीबार सुरू आहे, पर्यटकांनाही गोळ्या लागलेत, असे सांगितले. त्याच क्षणी माघारी फिरलो आणि आम्हीही धावत सुटलो. सुमारे अर्धा पाऊण तासात पहलगाममध्ये आलो. काही वेळातच हा दहशतवादी हल्ला असल्याचे समजले, आणि सारेच अवाक झालो. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर भीतीही होती आणि इतक्या मोठ्या हल्ल्यातून केवळ ‘हॉर्स रायडिंग’ करायला गेलेल्या अर्ध्या तासाच्या वेळेमुळे वाचल्याचाही भावना होत्या.

हॉर्स रायडिंग केले नसते तर त्या वेळेत प्रत्यक्ष हल्ला झालेल्या घटनास्थळावर असतो. त्यामुळे हॉर्स रायडिंगला वेळ गेला, त्यामुळेच जीव वाचला, असे सापळे यांनी सांगितले. बुधवारी सकाळपासून परिसरात जमावबंदी लागू केली आहे. रस्त्यावर पोलिस आणि सैन्यातील जवान दिसत आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही हॉटेलमध्ये सुखरूप असल्याचेही सापळे यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news