

कोल्हापूर : दै. ‘पुढारी’ व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉक्टर्स डे’निमित्त ‘डोळे आणि आरोग्य’ या विषयावर मंगळवार, दि. 1 जुलै रोजी ख्यातनाम डॉ. पद्मश्री तात्याराव लहाने यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. शाहू स्मारक, दसरा चौक येथे सायंकाळी 5 वाजता होणार्या या कार्यक्रमात डॉ. लहाने मार्गदर्शन व श्रोत्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणार आहेत. गेली 21 वर्षे ही आरोग्य व्याख्यानमाला अवितरपणे सुरू आहे. यंदाचे व्याख्यानमालेचे 22 वे वर्ष आहे.
आतापर्यंत या व्याख्यानमालेत वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या विविध मान्यवरांची व्याख्याने, आरोग्य शिबिरे, कोरोना काळात ऑनलाईन व्याख्यान, ध्यानमय योगासने शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत. त्यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, लाखो लोकांना याचा आरोग्यविषयक लाभ मिळत असून ही व्याख्यानमाला एक संजीवनीच ठरली आहे.
डोळा हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. बदलती जीवनशैली, धावपळीचे जीवन, ताणतणाव, असंतुलित आहार, वाढती व्यसनाधीनता, व्यायामाचा अभाव, इलेक्ट्रॉनिक गॅजेटस्, मोबाईल, टीव्ही यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एकंदरीत सर्वच वयोगटामध्ये स्क्रीन टाईम वाढत आहे. याशिवाय विविध कारणांमुळे डोळ्यांचे विकार दिवसेंदिवस वाढत आहेत. पूर्वी डोळ्यांचे आजार केवळ नैसर्गिक कारणांमुळे होत असत. आता डोळ्यांचे जास्त आजार जीवनशैलीशी निगडीत आहेत. पूर्वी औषध कंपन्या डोळ्यांसाठी अॅन्टिबायोटिकसारखी औषधे तयार करत; पण आता डोळ्यांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी 60 टक्के औषधे तयार होतात. डोळ्यांच्या आजारावर प्रचंड संशोधन होऊन उपचारात मोठी क्रांती झाली असली, तरी लोकांमध्ये डोळ्यांच्या आजारांबाबत जागरूकता कमी आहे. मधुमेह, रक्तदाब व इतर काही आरोग्यविषयक व्याधींमुळेदेखील डोळ्यांवर परिणाम होतात. हे टाळावे कसे, डोळ्यांचे आरोग्य कसे जपावे, त्यासाठी कोणते उपाय करावेत आणि काय खासगी उपाय करू नयेत, तसेच डोळ्यांचे सौंदर्य आबाधित राखणे या विषयावरदेखील डॉ. लहाने मार्गदर्शन करणार आहेत.
डोळे : सौंदर्य, भावना आणि जीवनद़ृष्टी
डोळे हे मानवी सौंदर्य, भावना आणि अभिव्यक्ती यांचे सर्वात प्रभावी माध्यम आहेत. अनेक चित्रपट, गीते आणि कवितांमध्ये डोळ्यांना अनन्यसाधारण स्थान मिळाले आहे. म्हणूनच डोळ्यांची सौंदर्यद़ृष्टी टिकवण्यासाठी त्यांच्या आरोग्याकडे वेळेत लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे
आहे.
कार्यक्रम स्थळ : शाहू स्मारक भवन, दसरा चौक, वार व दिनांक : मंगळवार, दि. 1 जुलै, वेळ : सायंकाळी 5 वाजता.
लातूर जिल्ह्यातील माकेगाव येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेले डॉ. लहाने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एमबीबीएस, नंतर 1985 मध्ये नेत्ररोगशास्त्रात एमएस केले आहे. 36 वर्षे शासकीय सेवेत असतानादेखील त्यांनी ग्रामीण भागात सतत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केली. त्यामधून त्यांनी लाखो मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन लाखांपेक्षा अधिक मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या असून, त्यांच्या नावावर शस्त्रक्रियांचा जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ग्रँट मेडिकल कॉलेज व जे. जे. हॉस्पिटल, मुंबई यांचे डीन यासह अनेक शासकीय पदांवर त्यांनी काम केले आहे.
डॉ. लहाने यांच्या जीवन चरित्रावर ‘डॉ. तात्या लहाने ः अंगार पॉवर इज विदीन’ हा चित्रपट तयार करण्यात आला असून तो प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. त्यांना त्यांच्या आईने किडनी देऊन जीवनदान दिले आहे.
व्याख्यानाला प्रवेश अग्रक्रमानुसार देण्यात येणार असून, पहिल्या तीन रांगा राखीव आहेत. या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील यांनी केले आहे.