kolhapur | पाचगावसह परिसरातील बंद बंगले फोडणार्या अट्टल चोरट्याला बेड्या
कोल्हापूर : पाचगावसह परिसरात बंद बंगले फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकल्या. प्रताप सुरेश कदम (वय 31, रा. नक्षत्र पार्क, शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता.करवीर, मूळ शिवाजी पार्क, कासारवाडी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 44 लाख 68 हजार रुपये किंमतीचे 23 तोळे दागिने, 3 किलो चांदी हस्तगत करण्यात आली. 14 गुन्ह्यांची त्याने कबुली दिली आहे.
पाचगाव येथील शिक्षक कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहणार्या चोरट्याने दिवसभर पाचगावसह परिसरातील बंगल्याची रेकी करून रात्री बारा ते मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बंद बंगले फोडून मौल्यवान दागिन्यांसह दागिन्यांवर डल्ला मारण्याचा सपाटाच लावला होता. चौकशीत कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागातील गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी व्यक्त केली. घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात त्याच्याशिवाय साथीदाराचाही सहभाग असावा का, याचीही चौकशी करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
करवीरसह परिसरातील बंद बंगल्याची रेकी करून संशयित प्रताप कदम रात्रीच्या सुमाराला गुन्हे करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक सागर वाघ यांना मिळाली. पोलिस अधीक्षक गुप्ता यांच्या सूचनेनुसार तीन पथके नियुक्त करून चोरट्याच्या हालचालीवर वॉच ठेवण्यात आला.
संशयित उजळाईवाडी हद्दीत भारती विद्यापीठासह महामार्गावर चोरीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याचा सुगावा लागला. हवालदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, संजय पडवळसह पथकाने महामार्गावर त्यास ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडे 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळून आले. पथकाने पोलिसी खाक्या दाखविताच चोरट्याने एकापाठोपाठ एक अशा 14 घरफोडी, चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. चोरट्याकडून 230.190 ग्रॅम सोन्याचे व 3 किलो चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.
अंगठे बहाद्दूर... पण दागिने चोरण्यात पटाईत!
मूळचा कासारवाडी येथील चोरटा तीन वर्षांपूर्वी पत्नी, दोन मुलांसह पाचगाव येथील शिक्षक कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहण्यासाठी आला. कामधंदा नसल्याने रिकामटेकडा... पण अंगावर महागडे कपडे, रोज वेग वेगळ्या हॉटेलात जाऊन चैनीखोर वृत्ती...अफाट खर्चामुळे त्याच्याविषयी दबक्या आवाजात चर्चा होत... कामधंदा न करता एव्हाना मिळकतीचे कोणतेही साधन नसतानाही सतत चैनी...अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्याचे बिंग फोडलेच... त्याच्या करामती समजताच पाचगावकरांनाही धक्का बसला.

