

पाचगाव : पाचगाव-गिरगाव रस्त्यावरील अमृतनगर परिसरात मंगळवारी (दि. 6) रात्री भीषण अपघात झाला. दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत प्रशांत यल्लाप्पा टोपकर (वय 26, रा. पाचगाव, मूळ बेळगाव) हा तरुण जागीच ठार झाला, तर मयूर मोहन गुरव (30) आणि दिगंबर आप्पासो पाटील (33, दोघे रा. पाचगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 10.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अमृतनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण करून मयूर गुरव व दिगंबर पाटील हे दुचाकीवरून घरी परतत असताना, समोरून येणार्या प्रशांत टोपकरच्या दुचाकीची त्यांना जोरदार समोरासमोर धडक बसली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की, प्रशांत टोपकर याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य करत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
पाचगाव परिसरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये हळहळ
प्रशांत टोपकर हा गवंडी काम करत होता, मयूर गुरव सेंट्रिंग कामगार असून, दिगंबर पाटील हा बांधकाम व्यावसायिक आहे. तिघेही बांधकाम क्षेत्राशी संबंधित असल्याने ही दुर्घटना सर्वांसाठी धक्का देणारी ठरली आहे.