

कोल्हापूर : उन्हाळी सुट्टीची पर्वणी साधत रविवारी 91 हजार 26 पर्यटकांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आली. शुक्रवारपासून रविवारपर्यंत तीन दिवसांत 2 लाख 38 हजार 343 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
उन्हाळी सुट्टी असल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पर्यटक, भाविकांची संख्या वाढली आहे. दि. 16 मे रोजी 78,123, दि. 17 रोजी 70,194 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. कोल्हापुरात अंबाबाई मंदिरसह रंकाळा, टाऊन हॉल, न्यू पॅलेस येथे पर्यटकांची गर्दी वाढत असून येत्या आठवड्यात ही संख्या वाढणार आहे.
रविवारी सकाळपासूनच मुख्य दर्शनरांग तसेच अभिषेक व मुखदर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध— प्रदेश, राजस्थान येथून येणार्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. रविवारी अंबाबाई दर्शनानंतर पर्यटक भाविकांकडून कोल्हापुरी पदार्थ, दागिने, चप्पल यांची खरेदी करण्यासाठी प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे मंदिर परिसरातील बाजारपेठा पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेल्या.