

कौलव (जि. कोल्हापूर); राजेंद्र दा. पाटील : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपून जवळपास दीड महिना उलटला तरी अद्यापही राज्यात 87 कारखान्यांकडे 934 कोटी रुपयांची ऊसबिले थकीत आहेत. दरम्यान, साखर आयुक्तांच्या कारवाईच्या बडग्यामुळे गेल्या काही दिवसांत ऊस उत्पादकांना 369 कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र, उर्वरित बिले कधी मिळणार, असा सवाल राज्यातील शेतकरी करत आहेत.
गेल्या काही वर्षांत साखर कारखान्यांचा ऊस दर (एफआरपी) उत्पादकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. कारखान्याला ऊस पाठवल्यानंतर 14 दिवसांत ऊस बिले देण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यानंतर थकीत बिलांसाठी 15 टक्के व्याज आकारणीचीही तरतूद आहे. मात्र, काही अपवाद वगळता बहुतांशी कारखान्यांची ऊस बिले सतत थकीतच असतात. त्यामुळे शेतकरी चरकात पिळला जात आहे. एप्रिलअखेर राज्यातील 96 कारखान्यांकडे 1303 कोटी रुपयांची बिले थकीत होती. ऊसबिले वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
दरम्यान, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी 39 कारखान्यांना नोटीस पाठवून सुनावणी घेतली होती. या पार्श्वभूमीवर काही कारखान्यांनी मुदतवाढ मागितली. कारवाईच्या धसक्याने 11 मेपर्यंत शेतकर्यांच्या पदरात 369 कोटी रुपये एफआरपी पडली आहे. मात्र, 87 कारखान्यांकडे अजूनही 934 कोटी रुपयांची ऊसबिले थकीत आहेत. राज्यातील अनेक कारखान्यांची एफआरपी थकीत असताना साखर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारल्याने कारखानदारांचे धाबे दणाणले. काही वर्षांत राज्यात प्रथमच ऊस बिलांची थकबाकी हजार कोटींपेक्षा खाली आली आहे.
गळीत हंगाम घेतलेले कारखाने : 210
ऊस गाळप : 1,043 लाख टन
साखर उत्पादन : 98.88 लाख क्विंटल
एकूण एफआरपी तोडणी ओढणीसह : 40,646 कोटी रुपये
दिलेली एफआरपी तोडणी ओढणीसह : 39,512 कोटी
थकबाकी : 934 कोटी रुपये
100 टक्के एफआरपी दिलेले कारखाने : 127
80 ते 99.99 टक्के दिलेले कारखाने : 70
60 ते 79.99 टक्के दिलेले कारखाने : 07
00 ते 59.99 टक्के दिलेले कारखाने : 06
थकबाकी असलेले कारखाने : 83
दिलेल्या ऊस बिलांची टक्केवारी : 97.69