

कोल्हापूर : शासनाकडून आश्वासनांची पूर्तता न झाल्याने संतप्त झालेल्या बसमालक व वाहतूकदारांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात ५० हून अधिक ट्रॅव्हल्स बसेस घुसविल्या. त्यामुळे कार्यालयाचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले होते.
ई-चलन रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रदीप राठोड यांचे आमरण उपोषण मंगळवारी ११ व्या दिवशीही सुरू आहे. आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शंभरहून अधिक बसचालकांनी लाक्षणिक उपोषण केले. मनोज चौगुले, लक्ष्मण बोराडे, अमीन फरास, उत्कर्ष पवार व अमित भोसले यांच्या नियोजनाखाली बसचालक आणि वाहतूकदारांनी आंदोलन केले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीचे कार्याध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी शासनाने दोन दिवसांपूर्वी दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप केला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडण्याचे तर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठोस आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्ष बैठकीत विषय न घेतल्याने वाहतूकदारांमध्ये संताप वाढल्याचे ते म्हणाले. मनोज चौगुले यांनी आंदोलन चिघळल्यास आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल घडल्यास त्याची जबाबदारी सरकार, जिल्हाधिकारी व आरटीओ प्रशासनाची असेल, असा इशारा दिला. भाऊ घोगळे, अशोक शिंदे, अल्फान वडगावे आणि दिलदार मुजावर यांनी विचार मांडले. शासनाने तत्काळ मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात अरविंद चौगुले, मोहन मराठे, किरण हांडे, श्रीकांत बागडी, वरुण पारीक, आयुब पठाण यांच्यासह वाहतूकदार, बसमालक-चालक सहभागी झाले होते.
आरटीओचे मुख्य प्रवेशद्वार प्रशासनाने केले बंद
आंदोलनाची तीव्रता पाहून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरटीओचे कामकाज विस्कळीत होत असल्याचे सांगून बसेस कार्यालयाच्या आवारातून काढून घेण्याची विनंती केली. घटनास्थळी चालक उपलब्ध नसल्याने बसेस तत्काळ हलवणे शक्य नाही, अशी भूमिका बसमालकांनी घेतली. त्यानंतर आणखी बसेस परिसरात दाखल होत असल्याचे पाहून प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वार बंद करून कुलूप लावले.