

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील प्रवेशाची दुसरी फेरी पूर्ण झाली असून 1510 उपलब्ध जागांपैकी 1100 हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यात पत्रकारिता कोर्सच्या बीजे, एमजे व मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमांना 26 प्रवेश झाले असून अद्यापही 74 जागा रिक्त आहेत. विद्यापीठ प्रशासनाकडून प्रवेशाची तिसरी फेरी राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात अधिविभागांमधील रिक्त जागा भरण्याची शक्यता आहे.
विद्यापीठातील विविध 28 अधिविभागांमधील प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू असून 1510 जागा उपलब्ध आहेत. पहिली फेरी पूर्ण झाली असून यात सुमारे 837 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. परंतु बहुतांश अधिविभागातील प्रवेश जागा रिक्त राहिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एक पुनर्प्रवेश परीक्षा घेतली. त्यानंतर दुसरी प्रवेश फेरी राबविण्यात आली. 20 जुलै रोजी ही फेरी पूर्ण झाली आहे. यात एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
बॅचलर ऑफ जर्नालिझम, मास्टर ऑफ जर्नालिझम व एम.ए (मास कम्युनिकेशन) या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी सुमारे 100 प्रवेश जागा उपलब्ध आहेत. यात पहिल्या फेरीत बीजेला काही नसून दुसर्या फेरीत 5 विद्यार्थी आहेत. पहिल्या फेरीत एमजेला 2 प्रवेश झाले तर दुसर्या फेरीअखेर 8 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
एम.ए (मास कम्युनिकेशन) 13 विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. तिन्ही विभागाचे मिळून फक्त 26 प्रवेश झाले आहेत. पत्रकारितेच्या कोर्सला अद्यापही 74 जागा रिक्त राहिल्या असून विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्याचे चित्र आहे.
स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, लायब—री अँड इन्फॉर्मेशन सायन्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, एमए (योगशास्त्र) आदी अभ्यासक्रमांना प्रवेश हाऊसफुल्ल झाले आहेत. काही अभ्यासक्रमांच्या काही जागा रिक्त तर काही अभ्यासक्रमांना अद्याप प्रवेश झालेले नाहीत, अशी परिस्थिती आहे.