

दिलीप भिसे
कोल्हापूर : पुरोगामी चळवळीचे अधिष्ठान लाभलेल्या जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्यांच्या घटना काळजावर घाव घालणार्या आहेत. शहर, उपनगरांसह ग्रामीण भागात गर्भातच कळ्या खुडण्याचा गोरखधंदा सुरूच आहे. 2008 ते नोव्हेंबर 2025 या काळात जिल्ह्यातील गर्भलिंग निदान व गर्भपात करणारे 35 हून जादा अड्डे उद्ध्वस्त होऊनही या क्रूर घटना घडतच आहेत. या घटनांना प्रशासन रोखणार कधी? अनेकांच्या मौनी भूमिकेमुळे टोळ्या शिरजोर होऊ लागल्या आहेत.
अशा घटना रोखण्यासाठी व सराईत टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अशा रॅकेटमध्ये गुंतलेल्यांवर ‘मोका’अंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक संजीव झाडे यांनी बालिंगा (ता. करवीर) येथील स्वप्निल केरबा पाटील याच्याविरुद्ध ‘मोका’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे दाखल केला. तथापि, तांत्रिक कारणामुळे कारवाई टळली. स्वप्निल पाटीलवर 7, साथीदार दिगंबर किल्लेदार याच्यावर 3 गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे.
35 सेंटर्सवर छापे; 8 बोगस डॉक्टरांसह एजंटांवर दोषारोप
2008 ते नोव्हेंबर 2025 या काळात स्थानिक पोलिस यंत्रणेसह विशेष पथकांनी छापेमारी करून 35 बेकायदा सेंटर्स उद्ध्वस्त केली. 8 बोगस डॉक्टरांसह 60 पेक्षा अधिक एजंट, सराईतांना बेड्या ठोकून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. कारवाई झालेल्यांत एका महिला डॉक्टरसह पंधरावर महिला संशयितांचाही समावेश आहे. जिल्हा आरोग्य व स्थानिक पोलिस यंत्रणेमार्फत छापासत्र सुरू असतानाही गर्भलिंग निदान व गर्भपाताच्या घटनांचे सत्र सुरू आहे. कठोर कारवाईचा बडगा उगारूनही अगणित सेंटर चालविली जात आहेत.
गरजूंच्या खिशावर बेधडक दरोडा
जिल्ह्यासह सीमाभागात गरजूंची लूटमार केली जात आहे. 70 ते 80 रुपयांत मिळणार्या पाच गोळ्यांच्या पाकिटाची 35 ते 40 हजारांना विक्री केली जाते. गर्भलिंग निदान करण्यासाठी 75 हजारांपासून लाखावर रक्कम उकळली जाते. चिनी बनावटीच्या 50 ते 60 हजार रुपयांत मिळणार्या सोनोग्राफी मशिनच्या माध्यमातून लाखो रुपयांची लूटमार केली जात आहे.
2020 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान कारवाईच्या ठळक घटना
2020 कोडोली (ता. पन्हाळा) : गर्भलिंग निदान, गर्भपात सेंटरवर छापा; चौघांना अटक
2021 इचलकरंजी व परिते (ता. करवीर) सेंटरवर छापा
2023 कोल्हापूर शहर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, म्हाडा कॉलनी, बांबवडे (शाहूवाडी), चिखली रोड, वरणगे पाडळी, फुलेवाडी, मडिलगे खुर्द (ता. भुदरगड)
2024 परिते-कुरुकली (ता. करवीर) : डॉक्टर पत्नीसह तिघांना अटक
2024 पन्हाळा, राधानगरी तालुक्यांत छापा; दोघेजण जेरबंद
2024 आंबेवाडी-चिखली रोडवर छापा; चौघांना अटक
2025 फुलेवाडी, बुधवार पेठ, जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) : बोगस डॉक्टरसह पाचजणांना बेड्या; गंगावेस येथील औषध विक्रेत्याला अटक
2025 कळंबा येथील रुग्णालय आणि वरणगे पाडळी (ता. करवीर) येथे छापा : महिला डॉक्टरसह तिघींना अटक