Municipal elections | ‘निवडून येण्याची क्षमता’ घातक वळणावर!

महापालिका निवडणुकांमधील तीन हजारांवर उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
criminal background candidates
Municipal elections | ‘निवडून येण्याची क्षमता’ घातक वळणावर!
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : राज्यातील महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांनी ‘निवडून येण्याची क्षमता’ याच निकषाला प्राधान्य दिलेले दिसते. परिणामी, महापालिका निवडणुका लढवीत असलेल्या एकूण उमेदवारांपैकी तीन हजारहून अधिक उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्याबद्दल सर्वसामान्य मतदारांमध्ये चिंता व्यक्तकरण्यात येत आहे.

राज्यातील मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांचा सध्या रणसंग्राम सुरू आहे. या निवडणुकीत सर्व महापालिकांमध्ये मिळून एकूण 15,750 उमेदवार निवडणूक रणांगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे यापैकी 20 टक्के म्हणजेच जवळपास 3,150 उमेदवार हे वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, मारामारी, खंडणी, विनयभंग आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या या ‘कर्तबगारीकडे’ कानाडोळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे भविष्यात अशा गुन्हेगारांना उघड उघड राजाश्रय मिळण्याची वाट मोकळी झालेली दिसत आहे.

दुसरा निकष संपत्ती!

राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या ‘खर्चाच्या क्षमतेला’ म्हणजेच उमेदवारांच्या आर्थिक सुबत्तेला प्राधान्य दिलेले दिसत आहे. परिणामी, महापालिका निवडणुकांमधील बहुतांश उमेदवार हे लक्षाधीश, किंवा अब्जाधीशही असल्याचे दिसून येत आहेत. या निकषामुळे पक्षाची कामे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करणार्‍या सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्यांची मात्र परवड होताना दिसत आहे. अशा गर्भश्रीमंत उमेदवारांना शहरांच्या नेमक्या समस्यांची जाण असणार का, त्यांच्याकडून त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार का, याबाबत साशंकताच व्यक्तकरण्यात येत आहे.

सुजाणांची उदासीनता!

महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांची आणि गर्भश्रीमंताची भर पडल्यामुळे समाजातील सुजाण नागरिकांनी जशी काही या निवडणुकांकडे पाठ फिरविल्यासारखे वातावरण आहे. महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय नेत्यांकडून परस्परांवर होत असलेली खालच्या पातळीवरील टीका, भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप आणि दमबाजीमुळे सुजाण मतदार या सगळ्या प्रक्रियेपासून काहीसा अलिप्त राहात असल्याचे स्पष्टपणे जाणवून येत आहे. हा सुजाण घटकच जर मतदानापासून अलिप्त राहिला तर स्थानिक सत्तेची सूत्रे भलत्याच लोकांच्या हातात जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

समस्या मांडायचीही चोरी..!

शहरांमधील नागरिक आपापल्या प्रभागातील दैनंदिन समस्यांबाबत आपले गार्‍हाणे त्या त्या प्रभागातील नगरसेवकांकडे मांडत असतात. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिक सहसा गुन्हेगारांच्या वाटेला जात नाहीत, उलट अशा लोकांपासून ‘सुरक्षित अंतर’ ठेवूनच असतात. पण, भविष्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या दादा लोकांकडे स्थानिक सत्तेची सूत्रे गेली, तर नागरिकांना आपापल्या भागातील समस्या कुणाकडे आणि कशा मांडायच्या याची चिंता पडल्याशिवाय राहणार नाही. कारण, अशा ‘कर्तबगार’ लोकांकडे आपल्या समस्या मांडायला जायचे म्हटले, तरी लोकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

ऐन निवडणुकीत उमेदवारच हद्दपार..!

सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने (अजित पवार गट) आझम काझी याला उमेदवारी दिलेली आहे. या उमेदवारावर आणि त्याच्या टोळीवर खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, बेकायदा जमाव जमविणे, घातक शस्त्रे बाळगणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीतच पोलिसांनी या उमेदवारासह त्याच्या सात साथीदारांवर हद्दपारीची कारवाई केलेली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचे लक्षणीय प्रमाण विचारात घेता, उद्या हीच मंडळी स्थानिक राजकारणाची सूत्रे हाती घेण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागलेली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news