Kolhapur News| फुलेवाडी रिंगरोडवर २५ हजारांवर पाणीचोरांची ‘चैन’

अधिकारी, लोकप्रतिनिधींच्‍या वरदहस्‍ताने बेकायदा नळ जोडण्‍या
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal Corporation
Published on
Updated on

सतीश सरीकर

​कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या पश्चिमेला लागून ग्रामीण भागात अनेक उपनगरे झाली आहेत. फुलेवाडी आणि रिंगरोड परिसरात दिवसाढवळ्या चालणाऱ्या ‘पाणीचोरी’ने महापालिकेच्या कारभाराचे पुरते धिंडवडे काढले आहेत. सुमारे २५ हजारांहून अधिक पाणीचोर २४ तास फुकटचे पाणी वापरून महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहेत. यात निवासीबरोबरच व्यावसायिक बेकायदेशीर नळ कनेक्शनचा समावेश आहे. अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा वरदहस्त लाभल्याने सारे बिनदिक्कत सुरू आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या वतीने शहरवासीयांची तहान भागवण्यासाठी दररोज तब्बल १८० ते २०० एम. एल. डी. पाण्याचा उपसा केला जातो. प्रामाणिक करदाते नागरिक नियमित बिले भरतात, पाणी कपातीचे चटके सोसतात आणि वेळेवर पाणी न आल्यास प्रशासनाच्या नावाने शंखही करतात. पण याच कोल्हापुरात असा एक वर्ग तयार झाला आहे, ज्याला ना पाण्याची चिंता आहे, ना बिलाची भानगड. फुलेवाडी रिंगरोडवर घरटी बेकायदेशीर पाण्याचे नळ आहेत.

​भरदिवसा रस्ता उकरून तब्बल सहा इंच व्यासाची जलवाहिनी टाकण्याचा प्रकार फुलेवाडी, रिंगरोड मुख्य रस्त्यावर उघडकीस आला. महापालिकेने नेहमीप्रमाणे ‘अज्ञाताविरुद्ध’ गुन्हा दाखल केला. पण भरदिवसा सहा इंचाची पाईपलाईन टाकली जाईपर्यंत महापालिकेचे अधिकारी अन् कर्मचारी झोपले होते का? की या चोरीला प्रशासनातीलच काहीजण खतपाणी घालत आहेत? सर्वत्र सीसीटीव्हीचे जाळे असतानाही त्या व्यक्तींचा शोध न घेता अज्ञातांविरुद्ध गुन्हा का दाखल केला? पोलिस तर सीसीटीव्ही पाहून संबंधितांवर कठोर कारवाई करणार का, असा प्रश्न आहे.

थेट सर्जिकल स्ट्राईक करा...

​अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला, एवढे सांगून महापालिकेला आता हात वर करता येणार नाहीत. हे २५ हजार पाणीचोर अचानक आकाशातून टपकलेले नाहीत. वर्षांनुवर्षे चालणाऱ्या या चोरीकडे कानाडोळा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे. ​महापालिका प्रशासनाला खरोखरच शहराची काळजी असेल, तर केवळ कागदी घोडे न नाचवता फुलेवाडी रिंगरोड परिसरातील सर्व बेकायदेशीर जोडण्यांवर तातडीने ‘बुलडोझर कारवाई’ केली पाहिजे. सर्व अनधिकृत कनेक्शन तोडून टाकून पाणीचोरांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची कारवाई झालीच पाहिजे.

फुलेवाडी रिंगरोडवर बेकायदेशीररीत्या जलवाहिनी टाकण्यात येत होती. त्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फुलेवाडी, रिंगरोडसह शहरात अनधिकृत नळ कनेक्शन आढळल्यास संबंधितांवरुद्ध थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार आहे.
- हर्षजित घाटगे, जल अभियंता, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news