Tourist Accidents | ‘बेफिकीरी’ बेतू शकते जीवावर; पाच वर्षांत दीडशेहून अधिक पर्यटकांनी गमावला जीव

Tourist Accidents |
Tourist Accidents | ‘बेफिकीरी’ बेतू शकते जीवावर; पाच वर्षांत दीडशेहून अधिक पर्यटकांनी गमावला जीव
Published on
Updated on

मुरलीधर कुलकर्णी

कोल्हापूर : आषाढ-श्रावण महिना सुरू झाला की, सह्याद्रीच्या काळ्याकुट्ट कड्यांवरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि हिरवीगार निसर्गसृष्टी पर्यटकांना साद घालू लागते. वीकेंडला शहरांमधील धावपळीतून सुटका करून घेण्यासाठी लाखो पावले धबधब्यांच्या दिशेने वळू लागतात. महाराष्ट्रात सध्या ‘वर्षा पर्यटनाला’ मोठा बहर आला आहे. निसर्गाचा हा अद्भुत आनंद जरूर घ्यावा, पण याच आनंदात लपलेला बेफिकीरीचा आणि हुल्लडबाजीचा एक क्षण संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभराचे दु:ख देऊन जाऊ शकतो, हे अलिकडच्या काही दुर्घटनांवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेला प्राधान्य देणे ही काळाची गरज बनली आहे.

सह्याद्रीच्या मुख्य रांगा आणि घाटमाथ्यांमध्ये निसर्गाची मुक्त उधळण पाहायला मिळते. राज्यात छोटे-मोठे मिळून ३०० पेक्षा जास्त प्रमुख धबधबे आहेत, जे पावसाळ्यात प्रवाहित होतात. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील भांबवली वजराई (८५३ फूट), ठोसेघर, लिंगमळा; कोल्हापूर जिल्ह्यातील बर्की, रामतीर्थ, मानोली, राऊतवाडी आणि सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंबोली घाट धबधब्याचा समावेश होतो. याशिवाय पुणे-ठाणे सीमेवरील माळशेज घाट, नाणेघाट आणि काळू धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात देवकुंड, कुंभे, पांडवकडा तसेच रंधा व दुगरवाडी धबधबे पर्यटकांना भुरळ पाडत आहेत.

स्वयंशिस्त हीच काळाची गरज

निसर्गापुढे मानवाचे काहीच चालत नाही, म्हणूनच ‘इको-टुरिझम’च्या नावाखाली ‘इगो-टुरिझम’ न करता पर्यटकांनी प्रशासकीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हवामान खात्याचा 'रेड' किंवा 'ऑरेंज' अलर्ट असताना घाटांमधील प्रवास टाळावा. केवळ अधिकृत आणि सुरक्षित ‘व्ह्यू पॉईंट’वरूनच धबधब्याचा आनंद घ्यावा. स्थानिक प्रशासनाने प्रतिबंधित केलेल्या धोकादायक क्षेत्रांमध्ये चोरून प्रवेश करू नये. ओल्या निसरड्या वाटांवरून चालताना चांगल्या ग्रीपचे शूज वापरावेत आणि स्थानिक लोकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

हुल्लडबाजी, सेल्फीच्या नादात अनेकांचा मृत्यू...

धबधब्यांचे हेच सौंदर्य अनेकदा पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे किंवा निसर्गाच्या लहरीपणामुळे जीवघेणे ठरले आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील धबधबे आणि तलावांमध्ये हुल्लडबाजी किंवा सेल्फीच्या नादात १५० पेक्षा जास्त पर्यटकांनी आपला जीव गमावला आहे. यातील काही प्रमुख दुर्घटनांमध्ये ३० जून २०२४ रोजी लोणावळ्याच्या भुशी डॅम परिसरात पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने (फ्लॅश फ्लड) एकाच कुटुंबातील ५ जणांचा वाहून मृत्यू झाला. १६ जुलै २०२४ रोजी कुंभे धबधब्यावर रील्स बनवण्याच्या नादात ट्रॅव्हल इन्फ्ल्युएन्सरचा ३०० फूट दरीत कोसळून मृत्यू झाला. १४ सप्टेंबर २०२५ रोजी माळशेज घाटातील काळू धबधब्यावर ट्रेकिंग करताना अचानक दरड कोसळून एका तरुणाला जीव गमवावा लागला. ४ जुलै २०२६ रोजी खारघरच्या प्रतिबंधित पांडवकडा धबधब्यात उतरलेल्या २ तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

काय करावे?

हवामानाचा अंदाज घ्या : हवामान खात्याचा 'ऑरेंज' किंवा 'रेड' अलर्ट असल्यास घाटांमधील पर्यटन तत्काळ रद्द करा.

स्थानिक गाईडची मदत घ्या : स्थानिक लोकांना तिथल्या भौगोलिक परिस्थितीची (पाण्याची खोली, प्रवाह) अचूक माहिती असते, त्यांच्या सूचनांचे पालन करा.

सुरक्षित पादत्राणे वापरा : ट्रेकिंग किंवा धबधब्यावर जाताना चांगल्या ग्रीपचे स्पोर्टस्‌ किंवा ट्रेकिंग शूज वापरा.

वाहने सुरक्षित ठिकाणी लावा : दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी किंवा वळणावर वाहने उभी करू नका

काय करू नये?

रील्स आणि सेल्फीचा मोह टाळा : ओल्या, निसरड्या खडकांवर किंवा दरीच्या टोकावर उभे राहून फोटो काढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होय.

मद्यपान करून पाण्यात उतरू नका : बहुतांश दुर्घटना या मद्यधुंद अवस्थेत पाण्यात उतरल्यामुळे किंवा अतिआत्मविश्वासामुळे होतात.

प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करू नका : वन विभाग किंवा पोलिसांनी 'धोकादायक' म्हणून जाहीर केलेल्या ठिकाणी चोरून जाऊ नका.

पाण्याच्या प्रवाहाशी स्पर्धा नको : डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कधी वाढेल हे सांगता येत नाही, त्यामुळे पाण्याच्या मधोमध जाणे टाळा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news