

आजरा : आजरा तालुक्यात पोळगाव, खानापूर, एरंडोळ येथे महसूल विभागाने पोलिस फाट्यासह सुरू केलेल्या ‘शक्तिपीठ’च्या अक्षांश, रेखांश मॅपिंगच्या माध्यमातून माहिती संकलनाला तीव्र विरोध केल्यानंतर पेरणोली व हरपवडे येथील शेतकर्यांनीही तीव्र विरोध केला. सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायला निघाले असल्याची भावना शेतकर्यांनी तहसीलदार समीर माने व सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी ६० जणांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले.
कोणतीही पूर्वसूचना न देता संकलन सुरू केल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ‘शक्तिपीठ’ विरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा दिल्या. हरपवडे येथील रासुबाईच्या ओढ्यावर सकाळी ९ वाजता ‘शक्तिपीठ’च्या माहिती संकलनासाठी प्रशासन हजर होते. ही माहिती शेतकर्यांना मिळताच पेरणोली व हरपवडे येथील शेतकर्यांनी धाव घेतली.
यावेळी कॉ. संपत देसाई, रामचंद्र हळवणकर यांनी मनोगतातून शेतकर्यांवर होत असलेला अन्याय मांडला. यावेळी कारखाना संचालक हरिबा कांबळे, अमर पवार, सुभाष देसाई, संकेत सावंत, उदय कोडक, धनाजी सावंत, पांडू पाईम, श्रीधर हळवणकर, दत्ता गुरव, निवृत्ती कांबळे, शिवराम गुरव, शंकर तिबिले, विष्णू हळवणकर आदी शेतकरी उपस्थित होते.