

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा मानदंड आणि मराठी मनाचा अक्षय स्नेहबंध असलेल्या ‘गीतरामायण’च्या अमृततुल्य स्वरांनी कोल्हापूरची रसिक जनता पुन्हा एकदा मंत्रमुग्ध होणार आहे. महाराष्ट्राचे वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या शब्दप्रतिभेतून साकारलेले आणि भावगंधर्व सुधीर फडके यांच्या संगीताने अजरामर झालेले हे भक्तिरसायन, दैनिक ‘पुढारी’च्या माध्यमातून रसिकांसमोर सादर होत आहे.
या अलौकिक सोहळ्याचे मुख्य प्रायोजक मेसर्स गोपीनाथ अनंत चिपडे सराफ (भाऊसिंगजी रोड आणि व्हिनस कॉर्नर) असून, अॅस्टर आधार हॉस्पिटल हेल्थ पार्टनर म्हणून या उपक्रमाशी जोडले गेले आहेत.
शुक्रवारी (दि. 20 जून) सायंकाळी 6 वाजता येथील गोविंदराव टेंबे सभागृहात (देवल क्लब) हा स्वरसोहळा रंगणार आहे. ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके स्वतः या ‘गीतरामायण’चे सादरीकरण करणार असून, त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला एक विशेष उंची प्राप्त होणार आहे. प्रभू रामचंद्रांच्या जीवनचरित्रातील विविध प्रसंगांना गदिमांच्या 56 अलौकिक गीतांमधून आणि बाबूजींच्या हृदयस्पर्शी चालींमधून उलगडणारे ‘गीतरामायण’ हे केवळ संगीत नसून, तो एक गहन भावानुभव आहे. प्रत्येक शब्द रसिकांच्या काळजाला भिडत त्यांना एका वेगळ्याच भक्तिपूर्ण विश्वाची सफर घडवतो.
कार्यक्रम : गीतरामायण
सादरकर्ते : श्रीधर फडके
स्थळ : गोविंदराव टेंबे सभागृह (देवल क्लब), खासबाग मैदानजवळ, कोल्हापूर
दिनांक व वेळ : शुक्रवार, 20 जून, सायंकाळी 6 वाजता
प्रवेश : फक्त प्रवेशिका असलेल्या निमंत्रितांसाठी.