

कोल्हापूर : अफूची जिल्ह्यासह महामार्गावर तस्करी करणाऱ्या राजस्थानातील दोघा तस्करांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकल्या. सुरेश हैतराम बेनिवाल (वय 27, रा. अंबप फाटा, मूळ उद्धवनगर का बेरा, जोधपूर, राजस्थान), धनराज शिवलाल मेघवाल (25, आष्टा रोड, वडगाव, मूळ लोलावास, ता. लोणी, जि. जोधपूर) अशी त्यांची नावे आहेत.
तस्करांकडून 1 लाख 76 हजार 305 रुपये किमतीचा अफू साठा हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली. संशयित अंबप फाट्याजवळ अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. राजमाता जिजाऊनगर गल्ली क्रमांक 1 मधील इमारतीच्या टेरेशवरील खोलीची झडती घेऊन साठा हस्तगत करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले.