

विशाळगड : शिवकालीन किल्ले विशाळगड १५ फेब्रुवारीपर्यंत पर्यटकांसाठी खुलाच राहणार असून यामध्ये एका तासाची वाढ़ करण्यात आली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत पर्यंटकांना नियम व अटीसह गड पाहता येणार आहे, अशी माहिती शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण व पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी दिली.
गतवर्षी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून १४ जुलै रोजी गडावर हिंसाचार घडला. परिसरात संचारबंदी लागून गडावर प्रवेश बंद करण्यात आला होता. भाविक पर्यटकांना घातलेल्या बंदीमुळे विशाळगडावरील वर्दळ पूर्णपणे बंद झाली होती. यामुळे दैनंदिन व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. विशाळगडावर पर्यटक व भाविकांना प्रवेश द्यावा, अशी मागणी होत होती. याला काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. या सर्व पार्श्वभूमीवर दि. ३१ जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत भाविक व पर्यटकांसाठी दंगलीनंतर तब्बल १७५ दिवसांनी किल्ले विशाळगड खुला करण्यात आला. या घटनेला २६ दिवस झालेत. ३१ जानेवारी हा गड खुला राहण्याची शेवटची तारीख असल्याने गड पुन्हा बंद होणार की खुला राहणार याबाबत चर्चा सुरु होती. दै. पुढारीने शुक्रवारी दि.३१ जानेवारी रोजी याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच १५ फेब्रुवारीपर्यंत पर्यटकांसाठी गड खुला राहणार असल्याचा आदेश शाहूवाडी तहसीलदारांनी काढला आहे.
कोणालाही गडावर राहता येणार नाही.
संघटना किंवा जमावाला कोणत्याही प्रकारचा धार्मिक किंवा ऐतिहासिक कार्यक्रम परवानगीशिवाय घेता येणार नाही.
कार्यक्रमासाठी पोलिस प्रशासनासह स्थानिक स्वराज्य संस्थेची पूर्व परवानगी आवश्यक.
पशुहत्या बंदी असल्याने तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किल्ल्यावर मांसाहारी पदार्थ नेणे किंवा शिजवून तयार करणे यावर बंदी असेल.
केंबुर्णेवाडी येथे वाहनांची तपासणी करूनच दर्शनासाठी सोडले जाईल.