

कोल्हापूर : व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, परिख पूल याांसह लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याजवळील पूर्वेचा परिसर तसा गजबजलेला. शहरातील प्रमुख आणि मध्यवर्ती भाग असा लौकिक असतानाही पोलिस यंत्रणा आणि महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या परिसरात सायंकाळपासून पहाटेपर्यंत गुलाबी बाजार फुललेला असतो. पश्चिम बंगाल, दिल्ली, मुंबई उत्तर प्रदेशसह कर्नाटकातील 20 ते 30 वयोगटातील महिलांच्या झुंडीच्या झुंडी शरिरविक्रयासाठी रस्त्यावर दिसतात. रात्री-अपरात्री एखादा सामान्य मजूर घराकडे जाताना रस्त्यावर आढळला की, त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला जातो. मग रात्रीच्या अंधारात मध्यवर्ती चौक, रस्त्यावर फुललेला गुलाबी बाजार पोलिसांना दिसत नाही का?
ही झाली शहरातील प्रमुख चौक व सतत वर्दळ असलेल्या मार्गांची सद्य:स्थिती. तावडे हॉटेल, सांगली फाटा, उजळाईवाडी उड्डाणपूल, गांधीनगर परिसरासह पुणे-बंगळूर महामार्ग व रत्नागिरी-सोलापूर महामार्गावर काही लॉजमध्ये चालणार्या चोरी चोरी छुपके छुपके, हाय प्रोफाईल वेश्या अड्ड्यांकडे स्थानिक यंत्रणांनी केवळ डोळेझाक नव्हे तर रॅकेटमधील सराईतांना मोकळे रान सोडले आहे.
भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बस-रेल्वेस्थानकासह धार्मिक स्थळ परिसरात रात्री दहानंतर सार्वजनिक चौक, मध्यवर्ती मार्गावरील आस्थापने बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, रेल्वे स्टेशन, शाहूपुरीसह लक्ष्मीपुरी येथील रात्रीचे व्यवहार बंद ठेवण्यास भाग पाडले. अगदी चहापानाच्या टपर्याही बंद करण्यात आल्या. मात्र प्रमुख चौकात फुललेला गुलाबी बाजार तसूभरही हटला नव्हता. उलट काही ठरावीक वेश्या अड्ड्यांवर महिलांची गर्दी दिसून येत होते. एजंट, पंटर आणि आंबटशौकिनांचा गराडा पडला होता.
शहरातील मध्यवर्ती व्हीनस कॉर्नर ते रेल्वे स्टेशनदरम्यान रोडला अनेक भव्य-दिव्य अशी व्यापारी शोरूम्स उभी राहिली आहेत. शहरात येणार्या देश-विदेशातील भाविकांसह पर्यटकांची वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीसाठी परिसरात असलेल्या शोरूमला हजेरी लागलेली असते. त्यामुळे शहराचा नावलौकिक वाढत असतानाच या भागात काही जुन्या इमारतीमध्ये चालणार्या गैरकृत्यांमुळे वैभवाला बाधा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पोलिसांनी गैरकृत्याची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे. वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणार्या समाजकंटकांविरुद्ध कारवाईची प्रभावी मात्रा लागू करणे शहर हिताचे ठरेल.
अल्पवयीन अथवा असहायतेचा गैरफायदा घेऊन युवती, महिलांना शरिरविक्रयासाठी भाग पाडणार्या तस्करसह एजंटांविरुद्ध सुधारित कायद्यामध्ये कठोर कारावासासह जबर दंडाची तरतूद आहे. मुली, युवतींना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणार्यांना दहा वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. भाडोत्री घर, जागा मिळवून देणार्या घरमालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी पंधरा घरमालकांवर कारवाई केली आहे. त्यात शहरासह उपनगरे व जिल्ह्यातील काही घरमालकांचा समावेश आहे.
कोल्हापूर शहर, उपनगरे आणि ग्रामीण भागात अलीकडच्या काळात मसाज सेंटरचे पेव फुटले आहे. उच्चभ—ू वसाहतीमध्येही काही ठिकाणी सेंटर सुरू आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने दोन वर्षांत पाच मसाज सेंटरचा भांडाफोड केला. नाव मसाज सेंटरचे आणि बाजार देहविक्रीचा, असाच सिलसिला सुरू झाला आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली चालणार्या वेश्याअड्ड्याविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे. 17 ते 25 वयोगटातील तरणी पोरं छुप्या चालणार्या मसाज सेंटरवर रात्रंदिवस पडून आहेत. भविष्यात ही एक सामाजिक समस्या सार्यांनाच भेडसावणार आहे.