

कोल्हापूर ः कोल्हापूर दक्षिणमधील विजयानंतर महाडिक यांच्या मिरवणुकीत ‘आता गोकुळमध्ये सत्तांतर’ असे फलक फडकले; मात्र गोकुळमध्ये सत्तांतर घडविणे हे केवळ आणि केवळ हसन मुश्रीफ, विनय कोरे व चंद्रदीप नरके यांची साथ मिळाली तरच शक्य आहे. अर्थात दोघेही महायुतीचे घटक असल्यामुळे पुढे कोण, कशा जोडण्या लावणार, यावरच हे अवलंबून आहे.
गोकुळमध्ये 21 संचालक आहेत. सत्तांतर घडवायचे असेल, तर 11 संचालकांची गरज लागेल. मुळात महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्या ताब्यात असलेला संघ सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे, चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, प्रकाश आबीटकर आदी नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून खेचून घेतला; मात्र राज्यातील सत्तांतराने गोकुळच्या सत्तेचा लंबक जोरात हेलकावे खात आहे. त्याची सुरुवात लोकसभा निवडणुकीतच झाली. वरिष्ठ मंत्र्यांच्या विनंतीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गोकुळ अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान केलेले अरुण डोंगळे महायुतीचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय झाले. विधानसभेत त्याचीच पुनरावृत्ती झाली. शिवसेना शिंदे गटाचे महायुती पुरस्कृत उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारात डोंगळे यांना सक्रिय करण्याचे वरिष्ठ मंत्र्यांच्या आदेशाने झाले. तेथेच गोकुळच्या सत्तेचा लंबक डळमळला.
गोकुळची सत्ता खेचण्यात सहभागी असलेल्या नेत्यांमध्ये हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके आणि विनय कोरे हे तिघेही आता महायुतीचे घटक आहेत. त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर गोकुळची सत्ता बदलू शकते. हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ व त्यांच्या संपर्कात असलेले अंबरिष घाटगे, स्वतः गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके व त्यांचे सहकारी एस. आर. पाटील, आबिटकर समर्थक नंदकुमार ढेंगे, शौमिका महाडिक, विनय कोरे यांचे निकटवर्ती करणसिंह गायकवाड व अमर पाटील हे नऊ संचालक थेट महायुतीच्या नेत्यांशी निगडीत आहेत. डॉ. सुजित मिणचेकर सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आहेत.
राज्यातील महायुतीच्या नेत्यांच्या आग्रहास्तव जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांना आपल्या संचालकांना वेगळी भूमिका घेण्यास सांगावे लागेल. विश्वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, चेतन नरके, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, रणजित पाटील, अभिजित तायशेटे, किसन चौगले हे 11 संचालक सतेज पाटील, के. पी. पाटील यांच्याशी निगडीत आहेत. सत्तांतर घडवायचे झाल्यास यातील आणखी दोन संचालकांना मुश्रीफ-कोरे-नरके यांना सोबत घ्यावे लागेल. राज्यातील सत्ताधारी नेत्यांची भूमिका आणि त्यांना मिळणारी साथ, यावरच सत्तांतर अवलंबून असेल.
नेत्यांनी गोकुळमध्ये सत्तांतर घडविले. गोकुळ सत्तांतरात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस होती; मात्र पहिली दोन वर्षे विश्वास पाटील व पुढील दोन वर्षे अरुण डोंगळे यांना अध्यक्षपद देण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला. त्यानंतर विश्वास पाटील यांची मुदत पूर्ण होताच त्यांनी राजीनामा दिला आणि डोंगळे गोकुळचे अध्यक्ष झाले. आता येत्या मे 2025 मध्ये त्यांच्या अध्यक्षपदाला दोन वर्षे पूर्ण होतात. अध्यक्ष बदलणे हे सर्वस्वी अध्यक्षांच्या राजीनाम्यावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यावेळी डोंगळे आणि गोकुळचे नेते काय भूमिका घेतात, यावरच गोकुळचा सत्ताबदल निश्चित होणार आहे. शेवटच्या एक वर्षात नाविद मुश्रीफ यांना अध्यक्षपद दिले जाण्याची चर्चा आहे.