

कोल्हापूर : नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी अर्ज माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी बुधवारी जिल्ह्यातील कागल व पन्हाळा येथील प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाल्या.
कागलमध्ये सेहरनिदा मुश्रीफ बिनविरोध
कागल : कागल नगरपालिका निवडणुकीतून प्रभाग क्रमांक नऊमधील शिवसेना (एकनाथ शिंदे पक्ष) मंडलिक गट पॅनेलच्या नूरजहाँ निसार नायकवडी व मोहबतबी अब्दुल रशीद शेख यांनी आपले उमेदवारी अर्ज बुधवारी माघारी घेतले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू विकास आघाडीच्या उमेदवार सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाली. सेहरनिदा या मंत्री हसन मुश्रीफ यांचे बंधू अन्वर मुश्रीफ यांच्या स्नुषा आहेत. या प्रभागामध्ये केवळ तीनच उमेदवारी अर्ज छाननीनंतर शिल्लक राहिले होते.
पन्हाळ्यात सतीश भोसले बिनविरोध
पन्हाळा : पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद निवडणुकीत जनसुराज्य पक्षासोबत युती केलेले शिवशाहू आघाडीचे प्रमुख सतीश कमलाकर भोसले हे बिनविरोध निवडून येणारे पहिले उमेदवार ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारण गटासाठी भोसले रिंगणात होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी त्यांचे चुलत बंधू अशोक भोसले, तानाजी भोसले आणि गजानन कोळी यांनी या प्रभागातून अर्ज मागे घेतले. त्यामुळे भोसले यांची निवड बिनविरोध झाली.
कोणीही दबावाखाली येऊन माघार घेणार नाही : घाटगे
कागल : नगरपालिका निवडणुकीत आम्ही सामान्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली; मात्र प्रभाग क्रमांक नऊमधील आमच्या उमेदवार नूरजहा नायकवडी यांनी आम्हाला विश्वासात न घेता परस्पर माघार घेतली. त्यांनी का माघार घेतली, हे जनतेनेच तपासावे. का माघार घेतली, याचेे त्यांनीच उत्तर द्यावे. आमचे अन्य कोणीही उमेदवार माघार घेणार नाहीत. कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असे शिवसेनेचे कागल शहर अध्यक्ष महेश घाटगे यांनी सांगितले.