

उजळाईवाडी : लोखंडी पाईपने वर्मी मारल्याने परप्रांतीय कामगार उमेशकुमार बरसाती कुमार (30, मूळ गाव नेवरिया, जिल्हा श्रावस्ती उत्तर प्रदेश, सध्या राहणार कागल एमआयडीसी) याचा डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला. ही घटना कागल पंचतारांकित एमआयडीसीत बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
नीलमणी विनोद खुशवाहा (रा. जंगल लाला छपरा, कुशीनगर उत्तर प्रदेश) व अजय राजेंद्र कुशवाहा (रा. 25 मैनपूर, कुशीनगर. सध्या दोघेही रा. पंचतारांकित एमआयडीसी) या परप्रांतीय कामगारांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सत्यकुमार श्रीराजाराम कुमार (19, मूळ उत्तर प्रदेश, सध्या रा. कागल एमआयडीसी) याने गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिस अधिकारी श्रीमती टी. जे. मगदूम यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयितांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांना नऊ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.