

इचलकरंजी : त्रास देत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणातून गुरू ऊर्फ प्रसाद संजय डिंगणे (वय 17, रा. गणपती कट्टा, जवाहरनगर) या युवकाचा निर्घृण खून करण्यात सहाजणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी शिवाजीनगर पोलिसांनी शुभम वायुकुमार कोळेकर (25) याला अटक केली, तर त्याचे अन्य पाच साथीदार अल्पवयीन आहेत. त्यापैकी चौघांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. अन्य एका अल्पवयीनाचा शोध सुरू आहे.
कबनुरातील एका शाळेसमोर गुरुवारी रात्री खुनाची घटना घडली होती. मृत प्रसाद डेंगणे हा स्नेहसंमेलन पाहण्यासाठी गेला होता. भागातील काही मुले त्याला दादागिरी करीत होती. याबाबत त्याने आपला मित्र सौरभ शहाजी पाटील (22, रा. गणपती कट्टा, जवाहरनगर) याला फोनवरून सांगितले. त्यामुळे सौरभ आणि त्याचा मित्र ओंकार कोरवी दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. त्यांनी दादागिरी का करता, अशी विचारणा केली. त्यातून वाद होऊन प्रसादवर गुप्तीने वार करण्यात आले. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला, तर सौरभ पाटील हा पाठीत, मनगटावर झालेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झाला होता.
याप्रकरणी सौरभ पाटील याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुख्य संशयित शुभम कोळेकर याला पोलिसांनी अटक केली. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्याचे आणखी पाच साथीदार अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले.