CPR Hospital | ‘सीपीआर’मध्ये एमआरआयसाठी लागतेय महिनाभराची प्रतीक्षा

सातशेहून अधिक रुग्ण ‘वेटिंग’वर; यंत्रणेवर रुग्णसंख्येचा ताण
Kolhapur CPR Hospital
CPR Hospital | ‘सीपीआर’मध्ये एमआरआयसाठी लागतेय महिनाभराची प्रतीक्षा(File photo)
Published on: 
Updated on: 

​एकनाथ नाईक

कोल्हापूर : ​छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) अद्ययावत वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे एमआरआय तपासणीसाठी रुग्णांना तब्बल महिनाभर प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या एमआरआय विभागात सातशेहून अधिक रुग्णांची प्रतीक्षा यादी आहे. अपघातग्रस्त आणि अतितातडीच्या रुग्णांची तपासणी प्राधान्याने केली जात आहे. अन्य रुग्णांना तपासणीसाठी पुढील महिन्याच्या तारखा दिल्या जात आहेत.

जिल्ह्यासह शेजारील सांगली, सातारा आणि कोकणातूनही रुग्ण उपचारांसाठी सीपीआरमध्ये येतात. खासगी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एमआरआय तपासणीसाठी हजारो रुपये मोजावे लागतात. तुलनेने सीपीआरमध्ये ही तपासणी अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मोफत आणि अत्यंत माफक दरात केली जात असल्याने सर्वसामान्य रुग्णांचा कल येथे वाढला आहे. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयांत उपचार घेणारे रुग्णही अचूक निदानासाठी सीपीआरमध्ये येत असल्याने यंत्रणेवर अतिरिक्त ताण वाढला आहे.

सीपीआरच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) दररोज सुमारे १,५०० ते २,००० रुग्णांची नोंदणी होते. यातील अनेक रुग्णांना आजाराच्या अचूक निदानासाठी एमआरआयचा सल्ला दिला जातो. वर्षभरापूर्वी येथे अत्यंत अत्याधुनिक एमआरआय यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या अद्ययावत यंत्रणेमुळे मेंदू, मणका आणि इतर गुंतागुंतीच्या आजारांचे अत्यंत सूक्ष्म व अचूक निदान होत आहे. मात्र, एका तपासणीसाठी लागणारा तांत्रिक कालावधी लक्षात घेता या यंत्रावर दररोज केवळ २५ ते ३० रुग्णांचीच तपासणी होते.

आणखी एका एमआरआय यंत्राची गरज

एमआरआय यंत्रामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळेत व अचूक उपचार करणे शक्य झाले आहे; परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे तपासणीला महिनाभर प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक रुग्णांचे आजार बळावण्याची भीती आहे. त्यामुळे काही रुग्णांना नाइलाजाने खासगी डायग्नोस्टीक सेंटरचा आधार घ्यावा लागत आहे. प्रशासनाने सीपीआरमध्ये आणखी एक अत्याधुनिक एमआरआय उपकरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रुग्ण आणि नातेवाईकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.