

कुरुंदवाड : औरवाड-गणेशवाडी मार्गावर ट्रॅक्टर व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात शेडशाळ (ता. शिरोळ) येथील एकाचा जागीच मृत्यू झाला. बसाप्पा कांबळे (वय 45) असे त्यांचे नाव आहे. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
बसाप्पा कांबळे हे कामानिमित्त शिरोळ
येथे गेले होते. काम आटोपून ते मोटारसायकलवरून गावी परतत असताना औरवाड-कवठेगुलंद मार्गावर समोरून येणार्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी बसाप्पा यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. बसाप्पा कांबळे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे कार्यकर्ते होते.