

प्रवीण मस्के
कोल्हापूर : राज्यभरात यावर्षी वाजतगाजत सुरू केलेल्या अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वारंवार वेळापत्रकात होत असलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांसह पालक हैराण झाले आहेत. याला राज्याच्या शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार जबाबदार असल्याचे विद्यार्थी, पालकांमधून बोलले जात आहे. अकरावीची राज्यात प्रवेश प्रक्रिया एक अन् गोंधळ अनेक, अशी अवस्था आहे.
यावर्षी प्रथमच राज्यस्तरावरून एकच अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी जिल्ह्यातील 285 कनिष्ठ महाविद्यालयांतील 66 हजार 10 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या फेरीसाठी 41 हजार 899 ऑनलाईन नोंदणी झाली. 26 जून रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. प्रत्यक्षात त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत गुणवत्ता यादी जाहीर झाली नाही. अल्पसंख्याक समुदायाच्या शाळा, महाविद्यालयांतील प्रवेश क्षमता फेरबदल करणे अपेक्षित आहे.
काही न्यायालयीन प्रकरणे व तांत्रिक बाबींमुळे 26 जून रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करता येणार नसल्याचे परिपत्रक राज्याचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी काढले. मात्र, यातही आता बदल करण्यात आला. अचानकपणे शनिवारी सायंकाळी सुधारित अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.
दिवस चालेल व किती दिवसांत पूर्ण होणार, याची माहिती कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे प्रवेशाच्या अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाल्याने विद्यार्थी इतर अभ्यासक्रमांकडे वळले आहेत.
विद्यार्थी-पालकांचा उद्बोधन वर्ग न घेता प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली
शहरी, ग्रामीण विद्यार्थी-पालकांना ऑनलाईन प्रवेश फॉर्ममधील मुद्द्यांची कसलीही कल्पना नाही
विद्यार्थ्यांनी त्या-त्या प्रवर्गातील हमीपत्र जोडले असून, मूळ प्रमाणपत्र दाखल केल्यावर समस्या निर्माण होणार
अकरावीचे वर्ग 1 जुलै रोजी सुरू होण्याची शक्यता मावळली
दहावी परीक्षेतील बेस्ट ऑफ फाईव्हच्या निकषानुसार 5 विषयांत 175 पेक्षा कमी गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतून वगळण्यात आले आहे. त्यांना पुरवणी परीक्षा देऊनच 175 पेक्षा जास्त गुण मिळवावे लागणार आहेत. त्यानंतरच सुरू असलेल्या फेरीत प्रवेशासाठी त्यांना सहभागी होणे शक्य होणार आहे.