

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक अचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कामे लवकर मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेतील काही विभाग सुट्टीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत. तसे पत्र काही विभागांनी काढले आहे.
विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात सुरू आहे. प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची वाहने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. महिनाभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी कामे मार्गी लावण्यासाठी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात लगबग सुरू आहे. जिल्हा परिषदेमध्ये भरतीची प्रक्रिया सुरू आहे. अद्यापही काही विभागातील नोकरी भरतीची प्रक्रिया तांत्रिक बाबींमुळे पूर्ण
होऊ शकलेली नाही. जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील विकासकामे करण्यात येतात. आचारसंहितेपूर्वी त्यांना प्रशासकीय मान्यता घेऊन वर्क ऑर्डर देणे आवश्यक आहे. आचारसंहितेपूर्वी जर ही प्रक्रिया झाली नाही तर ही कामे रखडणार आहेत.
काही विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. अजूनही काही विभागांची निवड प्रक्रिया सुरू आहे. त्याची यादी तयार करावयाची आहे. आचारसंहिता लागल्यास ही कामेदेखील थांबणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील काही विभाग प्रमुखांनी सुट्टीच्या दिवशी देखील आपला विभाग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.