

पंकज चव्हाण
इचलकरंजी : पंचगंगा नदीवर सांगली फाटा ते उचगाव रेल्वे बि—जदरम्यान सहापदरी पिलर उड्डाणपुलासाठी तब्बल 1 हजार 913 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली असताना इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीवरील जुना पूल मात्र जीवघेण्या अवस्थेत पोहोचला आहे. सहा वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गंभीर दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे.
इचलकरंजी शहराला मानकापूर, हुपरी, यळगूड, सांगाव, कागल तसेच पंचगंगा नदीपलीकडील अनेक गावांना जोडणारा हा पूल वाहतुकीच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दररोज हजारो वाहनांची ये-जा या पुलावरून होत असते. ग्रामीण भागातून शहरात कामानिमित्त येणार्या नागरिकांसाठी हा पूल मुख्य जीवनदुवा ठरतो. सध्या पुलावरील लोखंडी संरक्षण पाईप अनेक ठिकाणी निघून पडल्या आहेत. त्यांचे पिलरही कोसळत आहेत. परिणामी, पुलावरून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच पुलावर मोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुलाची रुंदी कमी असल्याने दोन्ही बाजूंनी येणार्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. तसेच येथे रात्रीची प्रकाश योजना अपुरी असून पुलाच्या पूर्वबाजूच्या वळणावर झुडपे वाढली असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, नवीन उड्डाणपुलासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येत असताना जुन्या पुलाच्या किरकोळ दुरुस्तीकरिताही निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, अशी नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या पुलाचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती व संरक्षण कठड्यांची पुनर्बांधणी करावी, अशी जोरदार मागणी वाहनधारक व नागरिकांकडून होत आहे.
सहा दशकांच्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती गरजेची
इचलकरंजी व पंचगंगा नदीपलीकडील गावांना जोडणार्या या पुलाचे बांधकाम 1965 ते 1967 दरम्यान करण्यात आले. सुमारे साठ वर्षे ऊन, वारा, पावसाळा आणि महापुराचा मारा सहन करत हा पूल आजही भक्कम उभा आहे; मात्र नियमित देखभाल व डागडुजीच्या अभावामुळे त्याची अवस्था चिंताजनक झाली आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करून वेळेत दुरुस्ती केल्यास हा पूल पुढील अनेक वर्षे सुरक्षित वापरात येऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.